सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कराडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये केला. यावरुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. हाच फॉर्म्युला पूर्ण देशात आणण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच काहीही झाले तरी काँग्रेसचा हा प्लॅन मी आहे, आणि जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे, तो पर्यंत कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले?

“कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या सातारकरांना माझा नमस्कार. सातारा हे देशभक्तांसाठी एखाद्या तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. या मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. माझे काही सहकारी म्हणत होते, तुम्ही साताऱ्यात आले नाही तरी चालेल. मात्र, मी त्यांना म्हटलं, साताऱ्यात भगवा आधीही फडकत होता, आताही भगवा फडकत राहील. आज मी सातारकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकला, यानंतर आता ती जबाबदारी आहे. आता या ठिकाणाहून एक संदेश घेऊन जायचा आहे की, फिर एक बार मोदी सरकार”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा : Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…

“या ठिकाणी आल्यावर काही गोष्टी आठवतात. २०१३ ला जेव्हा भारतीय जनता पार्टीने मला पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले होते. तेव्हा मी रायगडावर आलो होतो. कोणतेही काम सुरु करण्याच्या आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. तेव्हा जी प्रेरणा मला मिळाली त्या विचारावर चालण्याचा मी प्रयत्न करत आहे. साताऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन पाहिले आहे. साताऱ्याची ही भूमी ही शौर्याची भूमी आहे”, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

“काँग्रेसने ६० वर्ष देशावर राज्य केले. मात्र, जम्मू आणि काश्मीमध्ये काँग्रेसने संविधान लागू करू दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जम्मू-काश्मीरवर लागू होतं नव्हतं. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर ३७० कलम हटवले. ३७० कलम हटवल्यानंतर देशाची शान वाढली. देशाच्या एकतेला ताकद मिळाली. ही गॅरंटी मी तुम्हाला दिली होती आणि आता पूर्णही केली. जम्मू-काश्मीमध्येही आता सर्वसामान्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. आमच्या सरकारने मोफत राशन, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी मेहनत घेतली आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

“काँग्रेसने एवढ्या वर्षात काय केलं? भारताचे संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध करते. मात्र, काँग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसीला जे आरक्षण मिळते ते सर्व मुस्लिमांना दिले. काँग्रेस संविधान बदलून हा फॉर्म्युला संपूर्ण देशात राबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी सांगतो, काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कान उघडे ठेवून ऐका. जो पर्यंत मी (नरेंद्र मोदी) आहे. आणि माझ्यावर जनतेचा आशीर्वाद आहे, तो पर्यंत काँग्रेसचा हा प्लॅन आम्ही यशश्वी होऊ देणार नाही. हे लिहून ठेवा”, असा थेट इशारा पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना दिला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi satara speech on congress and india opposition alliance lokshabha elections 2024 politics gkt