लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काहीच दिवस बाकी आहे. निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा उमेदवारांच्या प्रचारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात आघाडीवर आहेत. ते देशभर भाजपा आणि मित्रपक्षांच्या लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अशातच मंगळवारी (३० एप्रिल) त्यांनी महाराष्ट्रातील लातूर येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाने आयोजित केलेल्या सभेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदी छोटा विचार करतच नाही. मोदी देशासाठी महत्त्वकांक्षी दृष्टीकोन (व्हिजन) ठेवून विचार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी कधी छोटा विचार करत नाही. ईश्वराने मला बनवलं तेव्हा त्याने छोटा विचार केला नाही, त्याने खूप मोठा विचार करून मला बनवलं. देवाने माझ्या डोक्यात मोठी चिप टाकली आहे. त्यामुळे मी नेहमी मोठा विचार करतो. त्यामुळे छोटा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि विद्यापीठांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू गेल्या अनेक दशकांपासूनचे विक्रम मोडीत काढत आहेत. भारतीय नागरिकांमधील आत्मविश्वास वाढला आहे. भारतीयांमधला हाच आत्मविश्वास आपल्या देशाला खूप पुढे घेऊन जाईल. २०२९ ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हावी, भारताने या भव्य-दिव्य स्पर्धेचं यजमानपद भूषवावं हे माझं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे.
देशाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान म्हणाले, भारताने आज आपल्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. आधीचं सरकार २६/११ सारखा हल्ला झाल्यावर केवळ पाकिस्तानचा निषेध करायचं. परंतु, आता आपण शत्रूला त्यांच्या देशात जाऊन ठेचू शकतो. पूर्वी सातत्याने वर्तमानपत्रांमध्ये बॉम्बस्फोटांच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या. आपले पोलीस आणि संरक्षण प्रणाली नव्या धोक्यांना तोंड देण्यास सक्षम नव्हती. मात्र आज आपला देश सीमेवर प्रत्येक शत्रूला जशास तसं उत्तर देण्यास आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत सक्षम झाला आहे.
हे ही वाचा >> “ते कर्ज मी कधीच विसरू शकत नाही”, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत नरेंद्र मोदींचं वक्तव्य
लातूरमध्ये भाजपची सारी मदार पंतप्रधानांच्या भाषणावर
दरम्यान, लातूरच्या या सभेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील भाजपाची प्रचार यंत्रणा सक्रीय केली आहे. ४२ अंश तापमान असतानाही या सभेला गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी लोकसभा मतदारसंघातील समस्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजन चालू असल्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. लातूरच्या विकासाला रेल्वे डब्याच्या निर्मितीमुळे हातभार लागेल असं मोदी म्हणाले. मोदींच्या सभेमुळे तयार झालेलं वातावरण कमी करण्यासाठी मोदींवर समाजमाध्यमातून टीका केली जात आहे. मोदी म्हणजे चिनी वस्तू, मोदी म्हणजे खोटे बोलणारे, मोदी म्हणजे विश्वासार्हता नसलेले अशा टिपण्या काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून केल्या जात आहेत. पण काहीशी आळसावलेली भाजपची यंत्रणा पंतप्रधानांच्या सभेमुळे सक्रिय झाली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात काँग्रेसची गाडी सुसाट असल्याची चर्चा होती. त्याला पंतप्रधान मोदी यांच्या लातूरच्या सभेच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं आहे.