Premium

२०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य मी साध्य करत नाही, तोपर्यंत ईश्वर मला परत बोलावणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केलेलं एक विधान सध्या व्हायरल होत आहे.

pm narendra modi loksabha election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'ते' विधान व्हायरल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी मतदान होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं एक विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. याआधी एका मुलाखतीमध्ये “माझा जन्म आईच्या पोटी झाला नसून मला देवानं पाठवलं आहे”, असं विधान मोदींनी केलं होतं. या विधानावरून विरोधकांनी भारतीय जनता पक्षाला व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता मोदींनी केलेलं आणखी एक विधान चर्चेत आलं आहे. गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी केलेलं विधान शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीत पुन्हा व्हायरल होऊ लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

इंडिया टीव्हीवरील एका कार्यक्रमात मोदींनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरादरम्यान हे विधान केलं. फायनान्शियल एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृ्त्त दिलं आहे. “माझा असा विश्वास आहे की प्रत्यक्ष देवानंच मला विशिष्ट जबाबदारी देऊन इथे पाठवलं आहे. ‘विकसित भारत’चं ध्येय साध्य करण्यासाठी देवानं मला २०४७ सालापर्यंत दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करण्याचे आदेश दिले आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात म्हणाले.

“मला वाटतं देवानंच मला या विशेष हेतूसाठी पृथ्वीवर पाठवलं आहे. २०४७ सालापर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्याचं ध्येय साध्य करायचं आहे. ईश्वर मला त्यासाठी मार्ग दाखवतो. ईश्वरच त्यासाठी मला ऊर्जा देतो. २०४७ सालापर्यंत हे लक्ष्य मी साध्य करेन याचा मला पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत ते लक्ष्य साध्य होत नाही, तोपर्यंत ईश्वर मला परत बोलवणार नाही”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Video : “माझा जन्म झालेला नाही, मला देवानेच पाठवले”, पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान चर्चेत

टी. एन. सेशन यांचाही केला उल्लेख!

दरम्यान, यावेळी मोदींनी सर्वात कार्यक्षम केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी. एन. सेशन यांचाही उल्लेख केला. “१९९१ साली तत्कालीन काँग्रेस नेते राजीव गांधी यांची २१ मे रोजी हत्या झाली, तेव्हा निवडणुका २२ दिवस पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तोपर्यंत मतदानाचा फक्त पहिला टप्पा पार पडला होता. त्यानंतर १२ जून ते १५ जून या काळात निवडणूक पूर्ण झाली. जेव्हा एखाद्या उमेदवाराचं निधन होतं, तेव्हा फक्त त्याच मतदारसंघातली निवडणूक रद्द केली जाते. पण १९९१ साली देशभरातली निवडणूक पुढे ढकलण्यात आली”, असं मोदी म्हणाले.

“निवृत्तीनंतर हे सेशन १९९९ साली गांधीनगरमधून काँग्रेसच्या तिकिटावर आमचे तेव्हाचे पक्षाध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांच्याविरोधात निवडणूक लढले”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.

“माझा जन्म झालेला नाही, मला…”

दरम्यान, मोदींच्या आणखी एका विधानावरून सध्या चर्चा सुरू असून ते विधान त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं होतं. “माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की, माझा जन्म झाला असावा. पण आईच्या जाण्यानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो, तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, देवानेच मला पाठवले आहे. माझ्यातील ऊर्जा ही मानव शरीरातून मिळालेली नाही. ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे. यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे. तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे. मी काही नी तर देवाचे साधन आहे. देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करणे ठरविले आहे. त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो”, असं मोदी म्हणाले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi says god sent me for purpose will not die till then pmw

First published on: 01-06-2024 at 12:45 IST
Show comments