बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलत असताना मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी त्यांनी एक विचित्र टिप्पणी केली. ज्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या महिला आमदार खाजिल झाल्या, तर पुरुष आमदारांमध्ये कुजबुज सुरू झाली. नितीश कुमार यांच्या विचित्र वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
नितीश कुमार म्हणाले, “पुरुष रोज रात्री पत्नीशी संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो. नितीश कुमार पुढे लैंगिक शिक्षणावरही बोलले. लैंगिक शिक्षणावर बोलताना त्यांनी प्रजनन दर कसा कमी होतो यावरही भाष्य केलं. परंतु, ते वक्तव्य किळसवाणं होतं, असा आरोप विरोधक करत आहेत.
या वक्तव्यानंतर नितीश कुमार यांच्यावर विरोधक टीका करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. त्यांनी नितीश कुमार यांचं नाव न घेता इंडिया आघाडीवर टीका केली आहे. पंतप्रधान बुधवारी (८ नोव्हेंबर) मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, इंडी अलायन्सचे लोक सध्या भारतातलं विद्यमान सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्याच्या गप्पा मारत आहेत. त्यांच्यातला एक नेता जो इंडी अलायन्सचा झेंडा घेऊन फिरतोय, त्याने काल माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्या नेत्याने भर विधानसभेत, जिथे माता-भगिनीही उपस्थित होत्या, तिथेच घाणेरडं वक्तव्य केलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, कोणी कल्पना करणार नाही, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. त्यांना कसलीच शरम नाही. हा सगळा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्या नेत्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्या आघाडीतला एकही नेता माता-भगिनींबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात, त्यांच्या भयंकर अपमानाविरोधात एक शब्द बोलण्यास तयार नाही. जे लोक माता-भगिनींप्रती असा विचार करत असतील ते तुमचं काय भलं करणार? हे लोक तुमची आब्रू वाचवू शकतात का? तुमचा सन्मान करू शकतात का? आपल्या देशाचं किती मोठं दुर्दैव आहे बघा.
हे ही वाचा >> “पंतप्रधान मोदींसह भाजपाला गाडण्याची वेळ आलीये”, सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांचं मोठं विधान
पंतप्रधान म्हणाले, तुम्ही (इंडिया आघाडी) अजून किती खाली जाणार आहात? जगभरात आपल्या देशाला अजून किती अपमानित करणार आहात? मी आज देशातल्या सर्व माता-भगिनींना सांगतो की तुमच्यासाठी, तुमच्या सन्मानासाठी माझ्याकडून शक्य होईल ते सगळं मी करेन. मी मागे हटणार नाही.