दिमापूर (नागालँड) : काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांचा वापर ‘एटीएम’ म्हणून केला. मात्र, भाजप या प्रदेशातील आठही राज्यांना ‘अष्टलक्ष्मी’ (देवी लक्ष्मीची आठ रूपे) मानते. येथे कायमस्वरुपी शांतता नांदावी आणि त्यांच्या सर्वागीण विकासासाठी भाजप काम करत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिमापूर येथे एका निवडणूक सभेस संबोधित करताना मोदी म्हणाले, की नागालँडमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रयत्नशील आहे. जेणेकरून राज्यातून १९५८ चा सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा, पूर्णपणे हटवला जाईल. आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवून देश चालवता येत नाही. तर त्यांचा आदर करून त्यांच्या समस्या सोडवता येतात. पूर्वी ईशान्येत फूट पाडण्याचे राजकारण होत होते, पण आता आम्ही येथे सक्षम व प्रभावी शासनव्यवस्था प्रस्थापित केली आहे. भाजप प्रदेश किंवा धर्माच्या आधारावर नागरिकांत भेदभाव करत नाही.

काँग्रेसच्या राजवटीत नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता होती, असा आरोप करून मोदी म्हणाले, की दिल्लीतून काँग्रेसकडून दूरनियंत्रकाद्वारे ईशान्येतील राज्यांवर नियंत्रण ठेवले जात होते. घराणेशाहीच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात होते. ईशान्येच्या राज्यांचा विकासनिधी काँग्रेसने लुटला. ईशान्येसाठी ‘मत मिळवा आणि विसरून जा’ हे काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांचे धोरण होते. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी नागालँडच्या समस्यांकडे डोळेझाक केली. दहा वर्षांपूर्वी या प्रदेशातील परिस्थिती अमूलाग्र बदलू शकते, असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल.

मोदींनी दावा केला, की भाजपने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून भ्रष्टाचाराला मोठा आळा घातला आहे. परिणामी दिल्लीतून पाठवलेला पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा होतो.

‘भारताच्या यशात मेघालयाचे भरीव योगदान’

शिलाँग : भारत यशाची नवनवीन शिखरे गाठत असून, मेघालय त्यात भरीव योगदान देत आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मेघालयात भाजपचे ‘कमळ’ फुलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी म्हणाले,की रस्ते, रेल्वे व हवाई संपर्काच्या कमतरतेमुळे मेघालयच्या विकासात भूतकाळात अडथळे येत होते. गेल्या नऊ वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने राज्य व ईशान्येकडील प्रदेशात सकारात्मक बदल घडवून आणले. मग ते तरुण, महिला, व्यापारी असोत किंवा सरकारी नोकर असोत. प्रत्येकालाच मेघालयात भाजपची सत्ता असावी असे वाटते. मेघालयास घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त करण्याची गरज आहे. फक्त दिल्लीतच नाही तर मेघालयातही एका कुटुंबाकडू चालवल्या जाणाऱ्या पक्षांनी आपली तिजोरी भरण्यासाठी मेघालयास ‘एटीएम’मध्ये रूपांतरित केले होते. मतदारांनी आता त्यांना नाकारले आहे. मेघालयात आता कुटुंबास नव्हे तर लोकांना प्रथम स्थान देणारे सरकार हवे आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नागालँडसाठी शांतता, प्रगती व समृद्धीची त्रिसूत्री निवडली आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेचा केंद्रिबदू महिला, आदिवासी व गरीब आहेत. भाजपने नागालँडला पहिली महिला राज्यसभा खासदारही दिली. नागालँडमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये ७५ टक्के घट झाली आहे. अनेक तरुण मुख्य प्रवाहात परतले आहेत. आम्ही ईशान्येकडील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम केले आहे. बदल स्पष्ट दिसत आहेत. आम्ही ईशान्येतील तरुणांना पर्यटनापासून तंत्रज्ञान व क्रीडा ते नवउद्योगांच्या क्षेत्रापर्यंत (स्टार्टअप) सर्व क्षेत्रांत पाय रोवण्यासाठी भक्कम पाठिंबा देऊ.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress in an election rally in dimapur zws