लोकसभा निवडणुकांसाठी आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. मात्र, त्याचवेळी इतर टप्प्यांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यात उत्तर प्रदेशमधील जागांसाठी सर्व सातही टप्प्यांमध्ये मतदान होईल. यादरम्यान, एकीकडे दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधील एका जाहीर सभेत विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली. तसेच, काँग्रेसला लक्ष्य करताना त्यांनी आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला.
उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूरमध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा गुरुवारी पार पडली. या सभेत मोदींनी काँग्रेस व समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. “काँग्रेसला कर्नाटकमधील आरक्षणाचं मॉडेल देशभरात लागू करायचं आहे. कर्नाटकमध्ये ओबीसींचा कोटा कमी करून त्या मुस्लीम समुदायाला आरक्षण देण्यात आलं आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.
“मी स्वत: ओबीसी आणि आणि मी आरक्षणाच्या या कर्नाटकच्या मॉडेलमुळे घाबरलो होतो. जर मलाच याची भीती वाटू शकते, तर तुमचं काय होत असेल?” असा सवाल मोदींनी उपस्थित केला. “मला गरीबांच्या वेदनेची जाणीव आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाला मी आरक्षण दिलं”, असंही मोदी म्हणाले.
दो शहजादे ते दो लडकों की जोडी!
दरम्यान, यावेळी मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष सपा व काँग्रेस आघाडीला लक्ष्य केलं. “लांगुलचालनाचं राजकारण करण्यासाठी उत्तर प्रदेशात दोन शहजादे एकत्र आले आहेत. तुम्ही या दोन मुलांच्या फ्लॉप जोडीकडून विकासाची अपेक्षा ठेवू शकता का?” असा खोचक सवाल मोदींनी केला. काँग्रेसचे वायनाडमधील उमेदवार राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर मोदींनी नाव न घेता ही टीका केल्याचं मानलं जात आहे.