पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दरम्यान, आज ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूर येथील भाजपा उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपाने आयोजित केलेल्या सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी, शिवसेना (ठाकरे गट) आणि ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले, इंडी आघाडीचा नेता कोण, त्यांचा चेहरा कोण तेच अजून ठरलेलं नाही. तिकडे (इंडिया आघाडी) अशी परिस्थिती असताना तुम्ही हा देश त्यांच्या ताब्यात देणार का? त्यांनी तर पाच वर्षांत पाच पंतप्रधान बनवण्याची योजना आखलेली दिसतेय.
सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मित्रांनो तुम्ही या मोदीला अनेक वर्षांपासून ओळखता पण इंडी आघाडीचा नेता कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यांचा नेता कोणालाही माहिती नाही कारण इंडी आघाडीत नेत्याच्या नावावरून महायुद्ध चालू आहे. त्यांच्या आघाडीचं नाव ठरलेलं नाही, त्यांचा चेहरा कोण आहे ते आपल्याला माहिती नाही. असं असूनही हे लोक इतका मोठा देश चालवू शकतात का? तुम्ही हा देश या लोकांच्या हातात देणार का? कोणी चुकूनही आपला देश त्यांच्या ताब्यात देणार नाही. या लोकांनी देशाची सत्ता काबीज करण्यासाठी वाट्टेल ते केलं आहे. या लोकांनी अनेकदा देशाचं विभाजन केलं आहे.
पंतप्रधान मोदी इंडिया आघाडीवर टीका करत म्हणाले, या लोकांनी आता नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. यांनी देशाला पाच वर्षांत, पाच पंतप्रधान देण्याचा फॉर्म्युला बनवला आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी एक पंतप्रधान बनेल. त्यानंतर तो त्याला हवा तितका आपल्या देशाचा खजिना लुटेल. त्यानंतर पुढच्या वर्षी दुसऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान होईल. तो वर्षभर लुटमार करेल. त्यानंतर पुढची तिन्ही वर्षे तीन नवे पंतप्रधान बनतील आणि ते लोक देश लुटतील. असं सलग पाच वर्षे चालेल. हे सगळं एवढ्यावरच थांबलेलं नाही. नकली शिवसेनावाले म्हणतायत की त्यांच्या आघाडीत पंतप्रधानपदासाठी खूप पर्याय आहेत. त्यांचा बोलघेवडा नेता तर म्हणतो की, ‘आम्ही एका वर्षांत चार पंतप्रधान बनवले तर काय जातंय?’ अशाने आपला देश चालेल का?
पंतप्रधान मोदी म्हणाले, पाच वर्षांत पाच वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या फॉर्म्युलाने हा इतका मोठा देश चालेल का? आपण कधी त्या दिशेला जाऊ शकतो का? परंतु त्यांच्याकडे (इंडिया आघाडी) सत्ता मिळवण्याचा हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांना देश चालवायचा नाही, त्यांना तुमच्या भविष्याची चिंता नाही, त्यांना तर केवळ मलाई खायची आहे.