लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यानंतर प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत आज माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केली. तसंच बाळूमामाच्या नावाने चांगभलं या घोषणाही त्यांनी दिल्या. मी आज तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. याचं कारण हे आहे की राजकारण्यांनी अशा सवयी लावल्या आहेत की सभेची वेळ ११ ची असेल तर नेते १ वाजता येतात. जनतेला याची सवय झाली. मी मात्र सगळीकडे वेळेत जातो. मी आलो आहे तेव्हापासून मी पाहतो आहे गर्दीचे लोंढे येत आहेत. जे पोहचले नाहीत त्यांचीही मी माफी मागतो. असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं?
लोकांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. माता भगिनी मला आशीर्वाद द्यायला येत आहेत हे मी माझं भाग्य समजतो. माझ्या मनात तुम्हा सगळ्यांसाठी कृतज्ञता भाव आहे. मोदी सरकारची दहा वर्षे आणि काँग्रेसची साठ वर्षे यांच्यातला फरक तुम्ही पाहत आहात. काँग्रेसने ६० वर्षे पंचायत समिती ते संसदेपर्यंत राज्य केलं. मात्र ६० वर्षांत जे काँग्रेसला जमलं नाही ते आम्ही १० वर्षांत करुन दाखवलं. असं मोदी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर उपस्थितांनी मोदी मोदीचा गजर केला.
गरीबी हटवण्याचा जप काँग्रेसने ६० वर्षे केला
“मागच्या ६० वर्षांत काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या तोंडून गरीबी हटवण्याचा जप ऐकला असेल. त्यांनी गरीबी हटावचा नारा देण्यापलिकडे काहीही केलं नाही. मात्र तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना आपण दारिद्र्यरेषेच्या बाहेर आणलं. जर कुणी गरीबीतून मुक्त होतं तर तुमचं समाधान होतं ना? आपल्याला पुण्य मिळतं. २५ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं याचं पुण्य कुणाला मिळणार? मोदींना नाही, २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत त्यांच्या आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहेत कारण तुम्ही मला हे काम करण्यासाठी निवडलं. हे सगळं तुमचं श्रेय आहे.” असंही मोदींनी म्हटलं आहे.
देशात पायाभूत सुविधा आम्ही वाढवत आहोत
“देशात बळकट सरकार असतं तेव्हा त्या सरकारचं लक्ष वर्तमानाकडे असतंच शिवाय भविष्याकडेही असतं. रेल्वे, रोड, विमानतळ या पायाभूत सुविधांसाठी आम्ही काम करतो आहोत. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांवर जो खर्च दहा वर्षांत झाला तो आपण एक वर्षांत करतो आहोत” असंही मोदींनी म्हटलं आहे.
शरद पवारांविरोधात टोलेबाजी
“१५ वर्षांपूर्वी एक नेते या तुमच्या भागात आले होते. त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगितलं होतं की या भागात पाणी पोहचवणार. त्यांनी पाणी पोहचवलं आहे का? तर नाही. तुम्हाला हे लक्षात आहे ना? त्यांनी वचन दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यांनी यानंतर या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली नाही. विदर्भ, मराठवाड्याला थेंब थेंब पाण्यासाठी तडफडवण्याचं पाप काँग्रेसच्या लोकांनी आणि काही नेत्यांनी केलं. साठ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीही पोहचवू शकलं नाही. अनेक सिंचन प्रकल्प रखडले होते. त्यातले २६ प्रकल्प महाराष्ट्रातले होते. महाराष्ट्राला या लोकांनी कसं फसवलं ते तु्म्हाला माहीत आहे. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. “
हे पण वाचा- “महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका
९० च्या दशकापासून शरद पवारांनी साखर कारखान्यांचा प्रश्न भिजत ठेवला
“२०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर या प्रकल्पांवर मी काम केलं आहे. १०० पैकी ६३ सिंचन प्रकल्प आम्ही पूर्ण देशभरात पूर्ण केले आहेत. काँग्रेसचं रिमोटवर चालणारं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रातले दिग्गज नेते कृषी मंत्री होते त्यांनी काय उस दरांच्या एफआरपीसाठी काय केलं? सहकारी साखर कारखान्यांचा प्रश्न मी त्यांच्याकडे घेऊन जायचो. मात्र त्या दिग्गज नेत्याने सहकारी साखर कारखान्यांची प्राप्तीकराची समस्या सोडवली नाही. आम्ही सहकारी साखर कारखान्यांना १० हजार कोटींचा दिलासा प्राप्ती कराच्या प्रश्नात दिला. ९० च्या दशकापर्यंत त्यांनी हा प्रश्न भिजत ठेवला होता. त्याचा फायदा उस उत्पादकांना झाला.”
मार्च २०२३ पासून १० हजार कोटींचं विशेष लोन घेण्याची योजनाही आम्ही सहकारी साखर कारखान्यांसाठी आखली. महाराष्ट्रातले दिग्गज नेते दिल्लीत बसले होते तेव्हा साडेसात लाख कोटींची खरेदी त्यांनी केली. जी आम्ही २० लाख कोटींपर्यंत नेली. दिल्लीतून शेतकऱ्यांच्या नावे पैसे निघाले की काँग्रेस त्यावर हात मारत असे. आता तसं घडत नाही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. असंही मोदी यांनी भाषणात सांगितलं.