लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला जोर आला आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तर आता तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. याआधीच्या प्रचारसभा होत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात प्रचार करते आहे. तर महायुती म्हणजेच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते महायुतीचा प्रचार करत आहेत आणि पंतप्रधानपदी मोदींना निवडून द्या हे आवाहन करत आहेत. याच धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“महाराष्ट्राची यावेळी असलेली भावनिक स्थिती ही भाजपाच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेबांची शिवसेना आमच्या बरोबर आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे लोकांना वाटतं आहे की उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न का मोडलं?”
हे पण वाचा- नाना पटोलेंचं वक्तव्य, “देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण, त्यांचा शाप..”
उद्धव ठाकरेंमध्ये सत्तेची लालसा
“उद्धव ठाकरे औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या काँग्रेसबरोबर सत्तेसाठी जाऊन बसले. औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा सत्तेसाठी गेला याचा राग महाराष्ट्राच्या मनात आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “बाळासाहेब ठाकरेंचा वारसा इतका मोठा आहे. शिवसैनिकांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं. शिवसैनिकांच्या सन्मानासाठी जी शिवसेना काम करत होती ती आज आमच्याबरोबर आहे.” असंही मोदी यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच शरद पवार यांना या वयात घर सांभाळता आलं नाही अशीही टीका केली आहे.
शरद पवारांबाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
“शरद पवारांबाबत जे झालं ती काही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा सगळा राजकीय मुद्दा केला आहे. तरीही महाराष्ट्रातल्या जनतेला कसं पटणार? त्यांच्या कुटुंबातला हा प्रश्न आहे. घरातलं भांडण, वारसा मुलाला द्यायचा की मुलीला? हा त्यांच्या घरातला वाद आहे. त्यामुळे शरद पवारांबाबत सहानुभूती नाही उलट संतापाचं वातावरण आहे. शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसा सांभाळतील असं लोकांना वाटतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक भावनिकदृष्ट्या आमच्या बरोबर आहेत.”
हे पण वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दावा, “लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ४०० पारचं टार्गेट…”
महाराष्ट्रात २०१९ जेव्हा विधानसभा निवडणूक पार पडली तेव्हा उद्धव ठाकरे हे भाजपासह निवडणूक लढले होते. मात्र नंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री झाले. त्यांच्या या कृतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतीत भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे म्हटलं आहे की जे उद्धव ठाकरेंनी केलं ते महाराष्ट्राला पटलेलं नाही. लोकांमध्ये त्यांच्याविरोधात नाराजी आहे आणि जनभावना भाजपासह आहे. या सगळ्याचा परिणाम नेमका काय आणि कसा होणार हे ४ जूनला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.