PM Narendra Modi Delhi Speech Today : भारतमाता की जय आणि यमुना मय्या की जय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. आज दिल्लीच्या लोकांमध्ये समाधान आणि उत्साह आहे. उत्साह विजयाचा आहे आणि समाधान दिल्ली ‘आपदे’तून मुक्त झाल्यामुळे आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिलं होतं आणि विनंती केली होती की २१ व्या शतकात भाजपाला सेवेची संधी द्या. दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्यासाठी ही संधी मी मागितली होती असं मोदी म्हणाले.

मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवलात मी तुम्हाला वंदन करतो-मोदी

मी दिल्लीकरांना वंदन करतो, कारण त्यांनी मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. मी दिल्लीकरांचे मनापासून आभार मानतो, दिल्लीने मनापासून आमच्यावर फ्रेम केलं. दिल्लीकरांना मी हा विश्वास देऊ इच्छितो की तुमचं प्रेम विकासाच्या रुपाने तुम्हाला परत देऊ. दिल्लीकरांनी आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दाखवला. हे कर्ज दिल्लीचं डबल इंजिन सरकार चुकवणार. आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीकरांनी ‘आपदा’ घालवली. यापासून दिल्ली मुक्त झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दिल्लीच्या विजयाने अराजकता, अहंकार आणि आपदा यांचा शेवट झाला आहे-मोदी

दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे, आज दिल्लीने विकास, दृष्टीकोन आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. आज अराजकता, अहंकार आणि दिल्लीवरच्या आपदा यांचा पराभव झाला आहे. या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली मेहनत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही सगळे कार्यकर्तेही या विजयाचे वाटेकरी आहात. मी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या विजयाच्या शुभेच्छा देतो. दिल्लीच्या जनतेने हे स्पष्ट केलं आहे की, दिल्लीची मालकी ही फक्त आणि फक्त जनतेकडे आहे. ज्या लोकांना दिल्लीचे मालक असण्याचा अहंकार होता त्यांना वास्तवाची जाणीव दिल्लीकरांनी करुन दिली.

दिल्लीच्या जनादेशाने दाखवून दिलं की राजकारणात……..

दिल्लीच्या जनादेशाने हे स्पष्ट केलं की राजकारणात शॉर्टकटसाठी, भ्रष्टाचारासाठी, खोट्या गोष्टींसाठी काहीही जागा नाही. जनतेने शॉर्टकर्टच्या राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं. दिल्लीच्या लोकांनी, लोकसभेच्या निवडणुकीत मला निराश केलं नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी भाजपाच्या सातच्या सातही जागा दिल्या. तीनवेळा लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीने शतप्रतिशत विजय मिळवून दिला. मात्र मी पाहात होतो की देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आणि दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात एक खंत होती. ती खंत दिल्लीची पूर्णपणे सेवा करता येत नाही हीच होती. आज दिल्लीने आमचा तो आग्रहही मानला.

दिल्लीचं भाजपाचं डबल इंजिन सरकार जनतेच्या प्रश्नांना वाहिलेलं-मोदी

दिल्लीच्या तरुणांनी आम्हाला साथ दिली आहे. दिल्लीत आज लागलेला निकाल हे दाखवून देतो आहे की भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा किती विश्वास आहे. लोकसभेतल्या विजयानंतर आम्ही सर्वात आधी हरियाणात अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा रेकॉर्ड केला, आता दिल्लीत नवा इतिहास रचला गेला आहे असंही मोदी म्हणाले आहेत. आपलं दिल्ली हे काही फक्त शहर नाही तर मिनी हिंदुस्थान आहे. दिल्ली हा लघुभारत आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारत हा विचार घेऊन जगणारं शहर आहे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Story img Loader