कोल्हापूरमधील तपोवन मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली. शिवसेना शिंदे गटाचे हातकंणगले लोकसभेतील उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली होती. यावेळी ‘जगात भारी कोल्हापूरी’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, “कोल्हापूरमध्ये फूटबॉल प्रसिद्ध आहे, असे मला कळलं. त्यामुळे फूटबॉलच्या भाषेतच सांगतो की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यानंतर एनडीए आणि भाजपा २-० ने पुढे आहे. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी शून्यावर आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, आता दोन गोल झाल्यानंतर कोल्हापूरकडे तिसऱ्या गोलची जबाबदारी आली आहे. कोल्हापूरकर असा गोल करतील की, इंडिया आघाडीच्या चारी मुंड्या चित होतील. दुसरीकडे इंडिया आघाडीने देशविरोधी आणि द्वेषाच्या राजकारणाचे दोन सेल्फ गोल केले आहेत. यामुळे मोदी सरकारच पुन्हा एकदा येणार, हे पक्के झाले आहे.”
“काँग्रेस आणि इँडिया आघाडीचे नेते पहिल्या दोन टप्प्यानंतर गोंधळले आहेत. आता ते ध्रुवीकरणाची भाषा बोलू लागले आहेत. जर देशात काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर ते जम्मू-काश्मीरमध्ये ३६० कलम पुन्हा लागू करण्याच्या विचारात आहेत. तसेच सीएए कायदादेखील त्यांना रद्द करायचा आहे. पण मला त्यांना एक सांगायचे आहे. ज्यांचे तीन अंकी आकड्याचे खासदार निवडून आणण्याचे वांदे झाले आहेत, ते सरकारच्या दारापर्यंत तरी पोहचू शकतात का?”, असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, इंडिया आघाडीचे लोक आता देशावर राग काढत आहेत. कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये यांचे नेते दक्षिण भारताचे विभाजन करण्याची भाषा वापरत आहेत. पण ते शक्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ‘अहद पेशावर, तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य’ अशी घोषणा ज्या मातीत झाली, ती माती इंडिया आघाडीच्या मनसुब्यांना पूर्ण करून देईल का? त्यामुळे विभाजनवादी भाषा बोलणाऱ्यांना तुम्ही चोख प्रत्युत्तर द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.