समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सत्तेत आल्यास अयोध्येतील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. इंडिया आघाडीवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “बुलडोझर कुठे चालवायचा हे शिकण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकवणी घेतली पाहिजे.” ते उत्तर प्रेदशातील बाराबंकी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाच्या भल्यासाठी काम करत आहे. तर इंडिया आघाडी अशांतता निर्माण करत आहे. निवडणुका जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे इंडिया आघाडीचे सदस्य तुटू लागले आहेत.”

“देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून भाजप हॅट्ट्रिक करेल”, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> “…तर मला फाशी द्या”, अदाणी-अंबानी मुद्द्यावरून मोदींचं थेट आव्हान; म्हणाले, “संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा…”

अखिलेश यादवांना नवीन मावशी मिळाली

“समाजवादी राजकुमार (अखिलेश यादव) यांना एका नवीन मावशी (ममता बॅनर्जी) च्या हाताखाली आश्रय मिळाला आहे. ही नवीन मावशी बंगालमध्ये आहे. आणि या मावशीने इंडिया आघाडीला सांगितले आहे की मी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईन”, असा टोलाही त्यांनी लगावला. अखिलेश यादव बसपा प्रमुख मायावती यांना आत्या म्हणाले होते. त्यावरू नरेंद्र मोदींनी ही टीका केली.

अयोध्या राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काँग्रेस फिरूव शकतो, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. “काही लोकांना वाटेल की हे कसं शक्य आहे. पण कोणत्याही संभ्रमात राहू नका. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ज्यांनी देशाची फाळणी केली त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की त्यांच्यासाठी देश महत्त्वाचा नाही. त्यांच्यासाठी कुटुंब आणि शक्ती हे सर्व काही आहे”, असंही मोदी म्हणाले.

…तर मला फाशी द्या

दरम्यान, एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की, “जर मी अप्रामाणिकपणा केला असेल तर मला फाशी द्या. जर मी चुकीच्या मार्गाने कोणाचाही फायदा केला असेल तर मला फाशी द्या. पण मी माझ्या देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर करेन,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.संपत्ती निर्माण करणाऱ्यांची आणि कामगारांची त्यांना सारखीच काळजी वाटते. “माझ्यासाठी तो भांडवलदारांचा पैसा, व्यवस्थापकीय लोकांची हुशारी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या कष्टकऱ्यांचा घाम याचा मी आदर करतो, असंही ते पुढे म्हणाले.