राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी चांगले उमेदवार, पक्षनिती, स्टार प्रचारक यासोबतच निवडणुकांचा प्रभावी प्रचार करणाऱ्या यंत्रणांची नितांत गरज भासू लागली आहे. खास करून २०१४ च्या निवडणुकांमध्ये प्रचाराचा एक वेगळाच स्तर निर्माण झाला. त्यानंतर राज्यांच्या निवडणुकांचाही प्रचार हायटेक पद्धतीने होऊ लागला. अनेक व्यावसायिक मंडळींची मदत या कामात घेण्यात येते. यावर्षी कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने निवडणूक रणनीतीकारांची मदत घेतली होती. मे महिन्यात विधानसभेचा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे रणनीतीकार सुनील कनुगोलू (Sunil Kanugolu) यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सल्लागार म्हणून नेमण्यात आले, तसेच या पदाला कॅबिनेट दर्जा देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कनुगोलू यांनी कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला विजय प्राप्त करून देण्यात मदत केली होती. सिद्धरामय्या यांच्या प्रशासनात कॅबिनेट दर्जाचे पद मिळाल्यामुळे निवडणूक प्रचारात रणनीतीकारांच्या भूमिकेचे किती महत्त्व असते, यावर पुन्हा प्रकाश टाकला गेला. यामध्ये आता २५ नोव्हेंबर रोजी राजस्थान आणि ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये होणाऱ्या निवडणुकांचाही समावेश आहे.

हे वाचा >> त्रिपुरा विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापलं; राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची टीम नजरकैदेत?

तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा निवडणूक प्रचार सांभाळणाऱ्या रणनीतीकाराने नाव न उघड करण्याच्या अटीवर द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, राजकीय आणि प्रशासनाशी संबंधित (ग्रामपंचायत स्तरांपर्यंत) विविध कृतीयोग्य मुद्द्यांची माहिती आमच्या टीमने बीआरएसच्या नेत्यांना दिली. “सुरुवातीला आम्ही सर्व ११९ विधानसभा मतदारसंघात काम करत होतो. पण, आता आम्ही संघर्षमय असलेल्या ५० जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. थेट मतदारसंघात राजकीय बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यम आणि प्रसार अशा विविध स्तरावर आमचे ३०० सहकारी काम करत आहेत”, अशीही माहिती या रणनीतीकाराने दिली.

सदर रणनीतीकार याआधी प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक (I-PAC) यांच्या संस्थेत काम करत होता. प्रशांत किशोर यांच्या संस्थेने यापूर्वी काही निवडणुकांमध्ये विजयी कामगिरी केलेली आहे. रणनीतीकाराने सांगितले की, त्यांची टीम बीआरएस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी रोजच्या रोज चर्चा करत असते. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणते मुद्दे हाताळायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची? याचे नियोजन करण्यात येते.

राहुल गांधी यांच्या प्रचाराचे काम तीन बंदर नावाची कन्सलटन्सी पाहते. या कन्सलटन्सीमधील सदस्य प्रीतम पाटील यांनी सांगितले की, ऑपरेशनल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक आउटरीच (ऑनलाइन, माध्यमे, ऑन-ग्राउंड), निःपक्षपाती राजकीय मुद्दे आणि प्रचारातून कोणता संदेश दिला जावा, याबाबतचे तपशील ते काँग्रेसला देतात.

“बहुसंख्य राजकीय उमेदवारांकडे व्यावसायिक सल्लागार टीमच्या ऐवजी त्यांच्या जवळचे लोक प्रचार करत असतात. हे जवळचे लोक बहुतेकवेळा नेत्याचे स्वीय सहाय्यक किंवा सोशल मीडिया हाताळणारे असतात. त्यामुळे त्यांना इनपुटसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. पदाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अनेकदा पक्षपाती असते”, अशी माहिती पाटील यांनी दिली. नेत्यांना ताज्या कल्पना, नवे दृष्टिकोन आणि नवे तंत्रज्ञान देण्याचे काम आम्ही करतो.

हे वाचा >> निवडणूक प्रचारासाठी बनविले एआय टूल; तरुणाने स्वतःच निवडणुकीत उतरून केली अनोखी जाहिरात

काँग्रेस आणि राज्यातील इतर काही नेत्यांसह काम करणाऱ्या मेघनाने सांगितले की, राजकीय सल्लागार म्हणून काम करताना आमचे प्राथमिक काम असते की, नेत्याचा संदेश डिजिटल आणि इतर माध्यमातून खालपर्यंत पोहोचवणे. त्यांच्या मतदारांपलीकडे नेत्याचे म्हणणे पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही काम करतो. पक्षाच्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने नरेटिव्ह ठरविलेले असते, पक्षाच्या विचारधारेच्यापलीकडे जाऊन त्या नरेटिव्हमधील मुद्दा आम्हाला लोकांसमोर ठेवावा लागतो. या माध्यमातून उमेदवाराला मतदारांशी वैयक्तिकरित्या जोडता येते, ज्यामुळे त्यांच्या जिंकण्याची शक्यता वाढते.

मेघना यांनी पुढे सांगितले की, राजकीय कन्सलटन्सी म्हणून आमच्याकडे राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडींची सर्व माहिती असते. या माहितीच्या आधारे उमेदवाराचा प्रचार प्रभावीपणे करणे आणि त्याला यश मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. कर्नाटकाचे उदाहरण याबाबत सर्वोत्तम आहे. कर्नाटकमध्ये कन्सलटन्सीला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे काँग्रेसला चांगला फायदा झाला आणि विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळवणे शक्य झाले.

उमेदवारांना रणनीती देण्याशिवाय मिरवणुका, जाहीर सभा, मतदारांसाठी संदेश तयार करणे आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणे इत्यादी प्रकारची कामे राजकीय सल्लागार कन्सलटन्सीकडून करण्यात येतात.

आणखी वाचा >> “देख रहे हो प्रमोद…”, निवडणूक प्रचाराला वेब सीरिजची भुरळ; छत्तीसगड काँग्रेसचा हटके प्रचार

डिझाईनबॉक्स्ड या कंपनीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रचारासाठी नेमले आहे. या कंपनीच्या एका सदस्याने सांगितले की, नाविन्यपूर्ण प्रचार करणे हा खूप महत्त्वाचा घटक आहे, मात्र राजकीय पक्ष अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या कंपनीचा प्रयत्न असतो की, जनतेला समजेल, उमजेल अशा भाषेत पक्ष किंवा त्यांच्या उमेदवाराचा संदेश नाविन्यपूर्ण कल्पनांसह पोहोचवणे. आम्हाला आशा आहे की, आमच्या प्रयत्नांना नक्कीच फळ मिळेल. आता ३ डिसेंबरच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

काही राजकीय सल्लागार राजकीय नेत्यांचे स्वतंत्रपणे काम करतात. राजकीय रणनीतीकार बी. सतीश हे आता भारत राष्ट्र समिती पक्षासह काम करत आहेत. ते म्हणाले, आम्ही बुथस्तरावर तटस्थ मतदारांना लक्ष्य करण्यासाठी उमेदवाराला विशिष्ट धोरणे आखण्यात मदत करतो.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political strategists helping parties with poll game plan how is campaigning done in rajasthan and telangana kvg