Chhattisgarh Legislative Assembly Election 2023 : छत्तीसगडच्या नक्षली भागात मतदान ड्युटी लागल्यानंतर एका प्रामाणिक निवडणूक अधिकाऱ्याची धडपड ‘न्यूटन’ या हिंदी चित्रपटातून अनेकांनी पाहिली असेल. दिग्दर्शक-लेखक अमित मसूरकर आणि न्यूटन कुमारची भूमिका वठविणारा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव यांनी नक्षलग्रस्त भागात मतदानाची प्रक्रिया पार पाडणे किती कठीण काम असते, याचे उत्तम चित्रण केले आहे. छत्तीसगडच्या बस्तर भागातील अबूझमाड जिल्ह्यात होणारी प्रत्येक निवडणूक अशाचप्रकारे यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान घेऊन येते. अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला हा परिसर अनेकांसाठी अज्ञात असा आहे. माओवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला म्हणून बस्तरकडे पाहिले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दावा करतात की, भाजपा सरकारने माओवाद्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आणले आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला ७ नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. छत्तीसगडमधील बस्तर भागात पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
गोव्यापेक्षाही मोठा असलेला, छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्याचा भाग असलेला आणि महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याशी सीमा लागून असलेल्या अबूझमाड जिल्ह्यात जवळपास २०० गावे आहेत. पण, या गावातील लोकसंख्या विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांची संख्या ४० हजारच्या आसपास आहे. नारायणपूर या नावाने असलेल्या विधानसभा मतदारसंघा अंतर्गत अबूझमाडचा संपूर्ण परिसर येतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अबूझमाडच्या ९० टक्के भागाचे अद्याप सर्वेक्षणच झालेले नाही.
हे वाचा >> छत्तीसगड : काँग्रेसकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर; एकूण २२ विद्यमान आमदारांना नाकारले तिकीट
अबूझमाडमध्ये राहणाऱ्या लोकांना अबूझमाडीया अशी संज्ञा वापरली जाते. “विशेषतः असुरक्षित आदिवासी गट” (Particularly Vulnerable Tribal Groups – PVTGs) या सात गटांचे लोक या ठिकाणी रहात असून या जमाती धोक्यात आलेल्या गटात मोडतात. त्यामुळे छत्तीसगडने त्यांना विशेष लाभ आणि हक्क प्रदान करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१८ पासून निवडणूक आयोग मतदानाबाबत सतत जागृती करत आहे. त्यामुळे अबूझमाडमध्ये नव्या ३१२ मतदारांची नोंदणी करणे शक्य झाले. नारायणपूर जिल्ह्यात १४,८०० मतदारांची नोंदणी झाली. बस्तरमधील इतर ११ विधानसभा मतदारसंघात सरासरी १३ हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी झाली. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, अबूझमाड प्रदेशात ३० मतदान केंद्रांपैकी दोन तृतीयांश मतदान केंद्रांवर अतिशय कमी प्रमाणात मतदान होते. एका बुथवर तर निवडणूक कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने पाठवावे लागते.
छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी रिना कांगले यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले, “बस्तर प्रदेशात पहिल्यांदाच दोन हजार मतदान केंद्रांवर लाईव्ह वेबकास्ट करण्याची सुविधा बसविण्यात आली आहे. याचे प्रक्षेपण नियंत्रण कक्षात केले जाईल. तिथून अधिकारी या केंद्रावरील हालचालींवर नजर ठेवणार आहेत. अशीच सुविधा छत्तीसगडमधील १२ हजार मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी अबूझमाडमध्ये मात्र लाईव्ह वेबकास्ट होणार नाही.”
हे वाचा >> छत्तीसगड : राहुल गांधींच्या रेल्वेप्रवासामुळे राजकारण तापले, काँग्रेस-भाजपा आमनेसामाने!
या ठिकाणी प्रत्येक एक मतदान महत्त्वाचे असते. २०१८ सालच्या निवडणुकीत, नारायणपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार चंदन कश्यप यांनी भाजपाचे नेते, दोन वेळा मंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या केदार कश्यप यांचा २,६४७ मतांनी पराभव केला.
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या पाच नेत्यांवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे या ठिकाणी किती प्रमाणात मतदान होईल, याबाबत आशंका व्यक्त केली जात आहे. नारायणपूर जिल्ह्यातील भाजपाचे निवडणूक समन्वयक रतन दुबे यांनी सांगितले की, अबूझमाड येथील मतदान केंद्रावर जाण्याची जोखीम भाजपा कार्यकर्त्यांनी उचलू नये, असे मी आधीच सांगितले आहे. नक्षल प्रभावित परिसर असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही हा धोका पत्करत नाहीत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भाजपाचे नारायणपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सागर साहू यांची हत्या झाली होती.
दुबे पुढे म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता लोक मतदान करायला बाहेर पडतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. यावर्षी एकामागोमाग भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची माओवाद्यांनी हत्या केली आहे. त्यानंतर आमच्यापैकी अनेकांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मलाही सुरक्षा देण्याबाबत विचारणा करण्यात आली.
नारायणपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित वसंत म्हणाले की, माओवादी अतिरेकी, भौगोलिक अडथळे आणि दुर्गम भागामुळे या ठिकाणी निवडणूक पार पाडणे आव्हान असते. लोकांचा सरकारवर विश्वास वाढावा यासाठी योग्य त्या खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत. गर्भवती महिलांसाठी आरोग्य शिबिर घेणे, शाळा पुन्हा सुरू करणे आणि शाळेच्या नव्या इमारती बांधण्यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. बस्तर प्रांताचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, सोनपूर आणि कोहमेट्टा या ठिकाणी नव्या पोलिस चौक्या बांधण्यात आल्या आहेत. दोंडरीबेदा, कडेमेटा, कडेनार आदी ठिकाणी पोलिसांचे तात्पुरते तळ उभारून लोकांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा >> सहा लाखांचे बक्षीस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक; छत्तीसगड सीमेवरील जंगलात पोलिसांची कारवाई
‘नक्सलबाडी अबूझमाड’ या पुस्तकाचे लेखक, पत्रकार आलोक पुतूल म्हणाले की, गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनात नक्षलींचा सहभाग होता, अशी टीका काही लोक करत आहेत. पण, मला मात्र हे सकारात्मक लक्षण दिसते. नक्षलवादी आपल्या मागण्यांसाठी हिंसाचाराचा मार्ग निवडण्याऐवजी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतील तर चांगलेच आहे.