गेल्या महिन्याभरापासून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या राज्यांमध्ये हे मतदान चालू आहे. तेलंगणामधील मतदान शेवटच्या टप्प्यात होणार असून ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याच्या सहा दिवस आधीच एका केंद्रावर मतपेट्या उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला आहे.
पाच राज्यांमध्ये मध्य प्रदेशसाठीही मतदान पार पडलं असून ३ डिसेंबर रोजी निकाल अपेक्षित आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात निकाल लागण्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजीच स्थानिक तहसील कार्यालयातील स्ट्राँग रुम उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसकडून या प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
“निवडणूक प्रक्रियेलाच बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डाग लावला आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाटचे जिल्हाधिकारी डॉ. गिरीश मिश्रांनी २७ नोव्हेंबर रोजीच स्ट्राँग रुम उघडून उमेदवारांना कल्पना न देताच मतपेट्या उघडल्या आहेत. शेवटच्या घटका मोजणारं शिवराज सिंह सरकार आणि अंधभक्तीमध्ये आकंठ बुडालले जिल्हाधिकारी लोकशाहीसाठी धोका आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं सतर्क राहावं. भाजपाच्या पराभवाच्या भीतीने सैरभैर झालेलं हे सरकार आणि काही सरकारी दलाल मतं चोरण्याच्या प्रयत्नात आहेत”, असं काँग्रेसनं एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये काही लोक खाली बसून पोस्टल मतांची पाकिटं हाताळत असल्याचं दिसत आहे. शिवाय दुसरीकडे या पाकिटांचे गठ्ठे करून एका कापडी पिशवीत भरले जात आहेत. काही लोक या सगळ्या प्रकाराचं व्हिडीओ शूटिंग करत असून “आम्हाला न बोलवता, न कल्पना देता तु्म्ही परस्पर स्ट्राँग रुम कशी उघडलीत?” असा प्रशन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
दरम्यान, स्थानिक अधिकारी गोपाल सोनी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. स्थानिक तहसिलदार कार्यालयातील एक खोली स्ट्राँग रुम केली असून त्यातच सर्व पोस्टल मतपेट्या ठेवल्या आहेत. आमच्याकडे रोज ऑनलाईन पोस्टल बॅलेट पद्धतीने आलेल्या मतांची पाकिटं येतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रुम उघडण्याच आली होती. त्यानंतर सर्व पाकिटांची प्रत्येक मतदारसंघनिहाय ५० मतांच्या गठ्ठ्यामध्ये वर्गवारी करण्यात आली”, असं ते म्हणाले.