लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी वाराणसीमध्ये मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना खास भेटवस्तू दिली. या भेटवस्तूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – कल्याण मध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा…मार्गात बदल…समजून घ्या… 

प्रफुल्ल पटेलांकडून मोदींना भेटवस्तू

पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी प्रत्येक नेत्याने त्यांच्या-त्यांच्या राज्यांचे प्रतिक म्हणून पंतप्रधान मोदींना भेटवस्तू दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही पंतप्रधान मोदी यांना शिवाजी महाराजांचा जिरेटोप भेट म्हणून दिला. यादरम्यानचा एक व्हिडीओ पुढे आला असून समाज माध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गंगा पूजन केले. तसेच कालभैरव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. या दरम्यान ते भावूक झाल्याचे बघायला मिळालं. यावेळी प्रतिक्रिया देताना, गंगा मातेने मला दत्तक घेतले असल्याचे ते म्हणाले. तसेच लोकांचे माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे हे पाऊल उचलणार होते”, प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले “एकनाथ शिंदे जे बोलतात…”

पंतप्रधान मोदींच्या ‘रोडशो’ला नागरिकांचा प्रतिसाद

तत्पूर्वी सोमवारी पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो केला. यावेळी वाराणसीतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. रोड शोनंतर एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी वाराणसीतील जनतेचे आभार मानले. “बाबा विश्वनाथांच्या नगरीतील देवरूप जनतेला वंदन आणि नमस्कार! आज माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण हा काशीच्या प्रत्येक कणाला नमस्कार करत आहे. आजच्या रोड शोमध्ये मला तुमच्या सर्वांकडून मिळालेला स्नेह आणि आशीर्वाद खूप अतुलनीय आहेत. त्यामुळे मी भारावून गेलो आहे आणि काहीसा भावूकही झालो आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या सावलीत १० वर्षे कशी गेली कळलेच नाही. गंगा मातेने मला बोलावले होते. आज आई गंगेने मला दत्तक घेतले आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.