लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही महाविकास आघाडीचं जागावाटप काही ठरत नव्हतं. त्यातच आज शिवसेना उबाठा गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही पहिल्या टप्प्यासाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याचे दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीच्या राज्यसमितीची काल बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणूक लढण्यासंदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत. आमच्याबरोबर जे आघाडी करण्यासाठी इच्छूक होते. त्यांना आम्ही सांगितले की, महाराष्ट्रातील जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्यावा. पण तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही. जरांगे पाटील यांच्यासह काल आमची बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी विचार विनिमय करून अर्ज करण्याचे आमचे ठरले आहे.”
प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत का? याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले. आज फक्त उमेदवारांची घोषणा करत आहे. प्रश्नोत्तरांना उद्या उत्तर देईल, असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगतिले.
लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, राजन विचारे, चंद्रहार पाटील यांना संधी
“भाजपाने मुस्लीमांना बाजूला टाकण्याचं राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याचे आम्ही ठरविले. तसेच जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे. मराठा, मुस्लीम आणि गरीब ओबीसी यांची सांगड घालून आम्ही नवी वाटचाल करत आहोत”, असेही प्रकाश आंबेडकर या पत्रकार परिषदेत म्हणाले.
राजकारणात हल्ली प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे निवडून गेलेला नेता जनतेशी बांधिलकी न ठेवता त्याला देणगी देणाऱ्यांशी बांधिलकी ठेवतो. त्यामुळे आम्ही सामान्य जनतेला आवाहन करत आहोत की, गावागावातून लोकांनी पुढे येऊन प्रचार करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीने खालील उमेदवारांची आज घोषणा केली
भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट
गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मढावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलढाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ओबीसी बहुजन पक्ष हा ओबीसांचा नवा पक्ष स्थापन झाला आहे. या पक्षाकडून सांगली येथे प्रकाश शेंडगे निवडणूक लढविणार आहेत. ते लढले तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. तसेच रामटेक मतदारसंघातील उमेदवाराचे नाव आज सायंकाळी जाहीर केले जाईल. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे.