पुणे : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील जरांगे यांची भूमिका संपली असे आम्ही मानत नाही.
निवडणुकीत ७० टक्के जागा इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील इच्छुकांना देण्यात आल्या आहेत. हे पाहता मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकते. तसेच ओबीसीचे मतदान देखील एकतर्फी होईल, अशी परिस्थिती आहे. इतर मागासवर्गीय समाज हा वंचितकडे वळाला असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्यासाठीच आम्ही लढत आहोत, त्यामुळे हा वर्ग आमच्यासोबत येईल. कोणाला मतदान करायचे नाही, हेदेखील आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी जाहीर केले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा >>> काँग्रेसला बंडखोरी रोखता आली नाही ही शोकांकिका कोणी केली ही टीका !
राज्याची लोकसंख्या सुमारे १३ कोटींच्या घरात आहे. दोन लाख रोजगार निर्मितीची आता गरज आहे. उंबरठे झिजविणारा वर्ग संपवायला हवा. त्यावेळी राज्यातील घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असेही आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा >>> विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे ‘जोशाबा समतापत्र’ प्रसिद्ध, नक्की काय म्हंटले त्यात !
आंबेडकरांची ९ नोव्हेंबरला सभा
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे वंचितच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदारसंघात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या होत्या. ९ नोव्हेंबरला सोलापूर येथून त्यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. याबाबत आंबेडकर यांना विचारले असता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd