अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप खेडकर हे उमेदवार आहेत. आज दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची नगरमध्ये सभा पार पडली. या सभेला संबोधित करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी एक धोक्यांची घंटा असल्याचे सूचक विधानही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“अहमदनगरमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे २८ मे २०२३ रोजी रात्री ११:३० वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन आले आहेत. त्यामुळे ही भेट बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. आता बाळासाहेब थोरात यांच्यासाठी दुसरी धोक्याची घंटा म्हणजे ९ जून २०२३ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान मल्लिकार्जुन खरगे हे सोलापूरवरून बेंगळूरूला गेले होते. यावेळी ८ जून २०२३ रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची गुप्त भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, हे मी आता सांगत नाही. मात्र, भाजपाची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहत आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी नगरच्या सभेत बोलताना केला.

हेही वाचा : नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत

बाळासाहेब थोरातांबाबत काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत बोलताना काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, “मी बाळासाहेब थोरात यांना सांगू इच्छित आहे की, ही परिस्थिती चांगली नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तिकडे तुमचा स्वत:चा पक्ष वाचवा, नाहीतर तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष हा कधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही”, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला.

पुण्यात दुसरा मोठा गौप्यस्फोट करणार

नगर दक्षिण लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचाराची सभा आज नगरमध्ये पार पडली. यावेळी या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटली यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. यानंतर याच सभेच बोलताना आपण आणखी एक गौप्यस्फोट करणार असून हा गौप्यस्फोट नगरमध्ये नाही तर पुण्यात करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on radhakrishna vikhe patil sujay vikhe secret meet to mallikarjun kharge in ahmednagar politics gkt