महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, तीन दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. मविआ नेत्यांनी यावेळी तिन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जागावाटपात कोणत्या जागा मिळाल्या आहेत याची यादीदेखील जाहीर केली. या यादीद्वारे सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सांगलीतून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील प्रयत्न करत होते. त्यांना सांगलीतल्या इतर काँग्रेस नेत्यांचा पाठिंबाही आहे. पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम हेदेखील पाटलांच्या समर्थनात मैदानात उतरले होते. कदम आणि पाटलांनी दोन वेळा दिल्लीवारी करून काँग्रेस पक्षश्रेंष्ठींची भेटही घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या भेटीनंतरही विशाल पाटलांना सांगलीतून तिकीट मिळालं नाही. काँग्रेस नेतृत्वाने सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते कोणता निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या विचारांत असल्याचीदेखील चर्चा रंगत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. स्वतः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत जाऊन चंद्रहार पाटलांसाठी प्रचारसभादेखील घेतली. ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत तीन दिवस सांगलीत तळ ठोकून बसले होते. राऊतांनी या तीन दिवसांत सांगलीत ठाकरे गटाची मोट बांधली. स्थानिक नेत्यांच्या आणि मित्रपक्षांमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. चंद्रहार पाटील सांगलीत प्रचार करू लागले आहेत. तर, विशाल पाटील अजूनही लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटील आता अपक्ष लढण्याच्या विचारांत असल्याची चर्चा आहेत..

दरम्यान, सांगलीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले विशाल पाटील सांगलीतून अपक्ष लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू, प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः ट्वीट करून याबाबतच माहिती दिली आहे.

हे ही वाचा >> “सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील (विशाल पाटील यांचे मोठे बंधू आणि वसंतदादा पाटील यांचे थोरले नातू) येऊन भेटून गेले. त्यांनी मला विचारलं की सांगली लोकसभेचं काय करायचं? मी त्यांना म्हटलं तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आता आम्हाला बघायचंय की त्यांच्यात हिंमत आहे की नाही. ते (प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील) लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू, असा आम्ही त्यांना शब्द दिलाय.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar vba supports vishal and pratik patil for sangli loksabha election 2024 asc