एकीकडे देशात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे गोव्यातल्या अवघ्या ४० जागांच्या निवडणुकीनं देखील चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपाने नाकारलेली उमेदवारी. उत्पल पर्रीकर यांना मनोहर पर्रीकर जिथून निवडणूक जिंकून यायचे, त्या पणजी मतदार संघातून उमेदवारी हवी असताना भाजपानं काँग्रेसमधील आयात उमेदवाराला तिथून संधी दिल्यामुळे उत्पल पर्रीकरांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
उत्पल पर्रीकर यांना वडिलांच्या मतदारसंघातून अर्थात पणजीमधून उमेदवारी हवी होती. मात्र, भाजपानं काँग्रेसमधून पक्षात आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिल्यामुळे उत्पल पर्रीकर नाराज झाले. त्यांना पक्षानं इतर दोन मतदारसंघांची ऑफर दिली होती, त्यातला एक मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ होता, असा खुलासा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधूनच निवडणूक लढवण्यासाठी अखेर पक्षाला रामराम ठोकत अपक्ष म्हणून पणजीमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
“उत्पल पर्रीकरांना ऑफर दिली होती, पण..”
एकीकडे उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीमुळे पणजीमध्ये भाजपासाठी आणि उमेदवार बाबुश मॉन्सेरात यांच्यासाठी पेपर अवघड झाला असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्पल पर्रीकरांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “मनोहर पर्रीकर पक्षाचे खूप मोठे नेते होते. त्यांना पक्षानं जेव्हा जेव्हा जे जे काम दिलं, ते त्यांनी पूर्ण केलं. कधी पणजीतून, कधी लोकसभेत, कधी उत्तर प्रदेशातून खासदारकी, पुन्हा इथे मुख्यमंत्रीपद.. असं पक्षानं जे सांगितलं ते त्यांनी केलं. उत्पल पर्रीकरसारख्या कार्यकर्त्याला पक्षानं ३-४ जागांवरून तिकिटाची ऑफर केली होती. खरंतर ते त्यांनी करायला हवं होतं. ते फार मोठे नेते झाले असते. पण त्यांनी तसं न करणं हे निराशाजनक आहे”, असं प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
“त्यांच्या मागे कोण आहे हे मी म्हणत नाही. त्यांचे ते स्वतंत्र आहेत. लोकांच्या किंवा इतर कुणाच्या म्हणण्यानुसार चालणं हे राजकारणात चालत नाही”, असं देखील प्रमोद सावंत म्हणाले आहेत.