Prashant Bamb Gangapur, Maharashtra Assembly constituency : छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे उमेदवार प्रशांत बंब यांचा नागरिकांवर आरडाओरड करतानाचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सभेला आलेल्या दोन नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर संतापलेल्या प्रशांत बंब यांनी त्या दोन व्यक्तींना सभास्थळावरून हुसकावून लावलं. बंब यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या त्या दोन जणांना धक्काबुक्की करत सभेच्या ठिकाणावरून हाकलल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. बंब मतदारसंघातील नागरिकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना दोन तरुणांनी त्यांना विचारलं की तुम्ही १५ वर्षे या मतदारसंघाचे आमदार आहात. तुम्ही मतदारसंघात काय केलं? त्यानंतर बंब यांनी उत्तर दिल्यानंतर एका तरुणाने प्रतिप्रश्न केला. त्यानंतर बंब यांचा पारा चढला. बंब म्हणाले, “विरोधक मुद्दाम अशा काही लोकांना सभेच्या ठिकाणी पाठवून गोंधळ घालत आहेत”.
नागरिकांवर संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवरून प्रशांत बंब यांच्यावर टीका होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघात काय केलं? असा प्रश्न विचारल्यानंतर प्रशांत बंब म्हणाले, “ए भय्या… तुला नसेल पटलं तर तू मत देऊ नको. ऐक…. तू काय करू लागला… तू पस्तावशील… मी नसलो तर तू पस्तावशील. हे लोक तुझी इतकी हालत खराब करतील…. सांगू का तुला… तू मरेपर्यंत पस्तावशील…” बंब यांच्या या अरेरावीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. त्यानंतर ते प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना म्हणाले, “तू मुद्दाम इथे आला. लोक शांत होते. तू दादागिरी करू लागला. ए… बास झालं आता. ए… यांना आता मागं न्या. चल मागे न्या याला. बास झाल… निवडणूक आहे आत्ता, मागे न्या त्याला, बाहेर घ्या त्याला. बाहेर हो चल….”
हे ही वाचा >> अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
त्यानंतर बंब यांच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन नागरिकांना धक्काबुक्की करत तिथून हुसकावून लागलं. बराच वेळ सभेच्या ठिकाणी गोंधळ चालू होता. काही वडीलधारी मंडळी बंब यांच्या कार्यकर्त्यांना समजावूनन सांगत होती. “हे नका करू, आपल्या गावाचं नाव खराब करू नका”. मात्र काही तरुणांच्या टोळीने त्या दोन तरुणांना धक्काबुक्की करणं चालूच ठेवलं होतं.
प्रशांत बंब यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, प्रशांत बंब यांनी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, “तुम्ही प्रसारमाध्यमांनी जे काही दाखवलं त्यात सर्व काही आलं आहे. अर्ध्या तासापासून मुद्दाम माझ्या सभेच्या ठिकाणी त्रास दिला जात होता. सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माझ्याविरोधात उभे आहेत. मी सभेमध्ये माझी कामं सांगत होतो. मात्र माझ्या सभेच्या ठिकाणी अशी सात-आठ मुलं पाठवली जातात. माझी सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातो. मला बोलू दिले जात नाही. तुम्ही समाजमाध्यमांवर पाहिलेला व्हिडिओ हा त्या सभेचा शेवटचा भाग आहे. मी उत्तर दिलं तरी ते तरुण दादागिरीने मला प्रश्न विचारत होते. त्यांना माझं उत्तरच नको होतं”.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
बंब म्हणाले, “माझी वेळ संपत आली होती. १० वाजल्यानंतर आचारसंहिता लागेल. माझी सभा होऊ नये, मला माझी बाजू मांडता येऊ नये, यासाठी माझ्या सभेत गोंधळ घातला जातो. म्हणून मी पोलिसांना म्हटलं की या दोघांना बाजूला घ्या. तिथेच साध्या कपड्यांमध्ये पोलीस होते. हा काही माझ्या सभेतील पहिला प्रकार नाही. याआधी २० ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या लोकांना बाजूला घेतलं नाही तर ते मला बोलूच देणार नाहीत. मी त्यांना म्हटलं की प्रस्तावशील, मी आमदार नसेन तर तुम्ही प्रस्तावाल, असं म्हटलं. तिथे उपस्थित लोकांनी मला प्रतिसादही दिला.