Exit Poll 2024 Result Updates : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून आता सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान, शनिवारी (१ जून) निवडणूक संपल्यानंतर अनेक संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असा दावा करण्यात आला आहे. भाजपाप्रणित एनडीएला या निवडणुकीत ३०० ते ३७० जागा मिळतील असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्समधून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र भाजपाचं ४०० पारचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही. दरम्यान, या पोल्समधील दावे फसवे असल्याचा सूर विरोधी पक्षांनी आळवला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोल्सवर प्रतिक्रिया देताना ‘संधीसाधू’ आघाडी (इंडिया) जनतेशी नाळ जोडण्यात अपयशी ठरली, असं वक्तव्य केलं आहे.
एक्झिट पोल्सवरील पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “प्रसारमाध्यमांवर दाखवले जातायत ते एक्झिट पोल्स नाहीत, ते मोदी मीडिया पोल्स आहेत. ते सगळं मोदींचं स्वप्नरंजन दाखवत आहेत. तुम्ही सिद्धू मूसेवालाचं (दिवंगत पंजाबी गायक) २९५ हे गाणं ऐकलंय का? आमच्या (इंडिया आघाडीच्या) तेवढ्या म्हणजेच २९५ जागा येतील.”
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील या एक्झिट पोल्सवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी सर्व एक्झिट पोल्स पाहून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “पुढच्या वेळी निवडणुका आणि राजकारणाचा विषय निघेल तेव्हा समाजमाध्यमांवरील तोतया पत्रकार, बोलघेवडे राजकारणी आणि स्वयंघोषित तज्ज्ञ, राजकीय विश्लेषकांच्या फालतू चर्चा आणि विश्लेषण पाहण्यात वेळ वाया घालवू नका.”
एक्झिट पोलआधीच प्रशांत किशोर यांनी निकालाचा अंदाज वर्तवला होता
“२०१९ पेक्षाही यंदा भाजपा अधिक जागा मिळतील”, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. “२०१९ पेक्षाही थोड्या फरकाने भाजपाच्या जागा वाढलेल्या असतील”, असं ते म्हणाले होते. प्रशांत किशोर म्हणाले होते की, “माझ्या विश्लेषणानुसार भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकते. पश्चिम आणि उत्तर भारतात जागांच्या आकडेवारीत फार मोठे बदल दिसण्याची शक्यता कमी आहे. मात्र पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाला चांगला पाठिंबा मिळत असून याठिकाणी त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.”