बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसेवाटप केल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात पोलिसांच्या बंदोबस्तात मतखरेदीसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तसेच यासंबंधीचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील असाच आरोप केला आहे. साताऱ्यातही मतांसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत अनेक ठिकाणी पैशांचा गैरवापर करत आहे. आमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतं विकत घेण्याचा प्रकार चालू आहे. मोदींनी भाजपाचा भ्रष्टाचार कॅशलेस केला असल्यामुळे त्यांना नोटा हाताळाव्या लागत नाहीत हे आपण निवडणूक रोख्यांच्या खटल्यावेळी पाहिलं आहे. मात्र या निवडणुकीत ते मतखरेदीसाठी नोटांचा वापर करत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सातारा लोकसभा मतदारसंघात आजवर कधीच जातीयवादी विचारांचा भाजपाचा उमेदवार निवडून आलेला नाही. मागील निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला आम्ही ९० हजार मतांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे आता आम्हाला उत्सुकता आहे की यंदा आम्ही त्यांच्या उमेदवाराला किती मतांच्या फरकाने पराभूत करणार? सातारा ही महाराराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. इथे फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार जन्माला आला. याच मातीतून म्हणजेच सांगली, सातारा, कोल्हापूरच्या लोकांनी राज्याला आणि देशाला विचार दिला. या ठिकाणी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव होणं कुणालाही सहन होणार नाही. त्यासाठी जातीयवादी भाजपाने कितीही प्रचार केला तरीही ते जिंकू शकणार नाहीत. त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रचार केला, कितीही संसाधने वापरली, तरी विचारांची ही लढाई आम्हीच जिंकणार आणि साताऱ्यात भाजपाचा पराभव होणार.” पृथ्वीराज चव्हाण हे एबीपी माझाशी बोलत होते.
हे ही वाचा >> काँग्रेसवाल्यांकडेच कोट्यवधींची रोकड कशी सापडते? पंतप्रधानांच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तुम्ही तर…”
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला की साताऱ्यात नेमकं कोण पैसे वाटप करत आहे? त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपाकडून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र ही लढाई त्यांच्या हातात राहिलेली नाही. त्यांनी मतं खरेदी करण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी ही लढाई त्यांच्या हातून केव्हाच निसटली आहे. लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई इथल्या शेतकऱ्यांनी, बेरोजगार युवकांनी आणि महागाईने त्रस्त असलेल्या जनतेने आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे आता पैशाने काहीच होणार नाही. कदाचित लोक पैसे घेतीलही, परंतु संविधान वाचवण्यासाठी लोक कटिबद्ध आहेत. शेतकऱ्यांचे, बेरोजगार युवकांचे अश्रू भाजपाचा पराभव करतील.