राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला शरद पवारांवर (राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष) गंभीर आरोप केला आहे. मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके म्हणाले, “अजित पवारांनी महायुतीबरोबर जायचं हे पक्षात (संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात) अडीच महिने आधीच ठरलं होतं. शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तशी चर्चा केली होती. याबाबत सुप्रिया सुळे यांना देखील कल्पना होती. शरद पवार या योजनेचा भाग होते. तसेच शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे हा त्याच योजनेचा भाग होता.” सुनील शेळके यांनी मतदानापूर्वी असा आरोप करणं आश्चर्यकारक मानलं जात आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुनील शेळके यांनी जे आरोप केलेत असे आरोप यापूर्वी देखील झाले आहेत. यात काहीच नवीन नाही. दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मला असं वाटतं की हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दोन्ही गटातील लोकांनी एक पुस्तक लिहावं. तारखांनिशी, योग्य क्रमवारीने सर्व घटना लिहून काढाव्या. कोणी, कुणाबरोबर, कधी बैठक घेतली, त्या बैठकीत काय घडलं, काय चर्चा झाली याचा लेखाजोखा मांडावा. जर कोणीतरी असं पुस्तक लिहिलं तर त्यावर चर्चा होईल.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राहिला प्रश्न सुनील शेळके यांच्या आरोपाचा, तर हा काही निवडणुकीचा मुद्दा नाही. हा आरोप स्वतः अजित पवारांनी देखील अनेकदा त्यांच्या भाषणांमधून केला आहे. मला असं वाटतं की कितीदा तुम्ही लोक (अजित पवार गट) तेच तेच उगळत बसणार आहात? तुम्ही रोज नव्याने तेच उगळत बसलात तरी लोकांनी नेमकं काय करायचं ते ठरवलं आहे. सध्या चालू असलेली लोकसभा निवडणूक ही देशातल्या शेतकऱ्यांनी, बेरोजगार युवकांनी, महागाईने त्रासलेल्या लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे आता देशातच नव्हे, तर आपल्या राज्यातही सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

हे ही वाचा >> “मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळायला हवं”, लालू प्रसाद यादवांचं वक्तव्य; चिराग पासवान पलटवार करत म्हणाले…

शरद पवारांकडून सुनील शेळकेंची कानउघडणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे दोन महिन्यांपूर्वी लोणावळा दौऱ्यावर असताना त्यांच्या पक्षाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी तिथल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे आमदार सुनील शेळकेंची तक्रार केली होती. तेव्हा शरद पवार भर सभेतून शेळके यांना उद्देशून म्हणाले होते, इथल्या स्थानिक आमदाराने आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचं मला सांगण्यात आलं. त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही त्याने दम दिला. मला त्याला सांगायचं आहे की, तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं ते आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुला निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म, पक्षचिन्ह कोणी दिलं ते आठवतंय का? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तू आज ज्या कार्यकर्त्यांना दमदाट करतोयस त्यांनी गेल्या निवडणुकीत तुझ्यासाठी घाम गाळला होता. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलंस तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने सहसा जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची परिस्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan says ncp leaders should write book on party split with chronology of events asc