“एकनाथ शिंदे गद्दार आहेत”, अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. चतुर्वेदी म्हणाल्या, गद्दार तर गद्दारच राहणार. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी चतुर्वेदी यांनी ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं’ अशा घोषणा दिल्या. तसेच सभेला उपस्थित लोकांना म्हणाल्या, आपल्या या घोषणा ठाण्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चतुर्वेदी यांनी यावेळी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार’ या हिंदी चित्रपटाचा उल्लेख केला. त्यांनी या चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात. त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं. असंच वाक्य श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय, ‘मेरा बाप गद्दार हैं.’ प्रियांका चतुर्वेदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर पूर्व-मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीने माजी खासदार संजय दिना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरलं आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये महाविकास आघाडीने प्रचारसभेचं आयोजन केलं होतं. प्रियांका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाचे नितीन बानुगडे पाटील यांनी या सभेला संबोधित केलं. या सभेत भाषण करताना प्रियांका चतुर्वेदी यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

हे ही वाचा >> “आम्ही लोकसभेला मदत करतो, तुम्ही विधानसभेला मदत केली नाही तर…”, गुलाबराव पाटलांचा भाजपाला इशारा

सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांनी या सभेपूर्वी एएनआयशी बातचीत केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील रहिवासी चीनी लोकांसारखे दिसतात”, असं वक्तव्य काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. यावर प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, मी सॅम पित्रोदांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मुळात पित्रोदा हे काही काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे सदस्य नाहीत, तसेच ते काँग्रेसचे स्टार प्रचारक देखील नाहीत. ते आपल्या देशात राहतही नाहीत. १९६९ पासून ते परदेशातच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आपल्या देशातील निवडणूक काळात महत्त्वाचा मुद्दा बनवणं दुर्दैवी आहे. देशात सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. महिलांवरील अत्याचार वाढलेत. देशातील मागासलेला वर्ग भाजपाच्या सरकारकडून अपेक्षा बाळगून होता. ‘अच्छे दिन’ येतील असं काहींना वाटत होतं. परंतु, ते काही झालं नाही. देशातला भ्रष्टाचार वाढलाय. शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. हे मुद्दे सोडून आपले पंतप्रधान सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर बोलत बसले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chaturvedi says my father is traitor message on srikant shinde forehead asc