Priyanka gandhi on PM Modi : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवारी (१४ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी प्रचार आटोपता घेत असताना एकमेकांवर जोरदार टीकादेखील केली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गांधी यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘तेरे नाम’चा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. प्रियांका गांधी म्हणाल्या, नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवायला हवा. या चित्रपटाला ‘मेरे नाम’ असं नाव द्यायला हवं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशमधील दतिया या विधानसभा मतदारसंघात प्रियांका गांधी यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या, मोदींबद्दल काही विचारू नका, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ते देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, जे नेहमी त्यांचं स्वतःचं रडगाणं गात असतात. ते कर्नाटकला गेले तर तिथे त्यांनी यादी वाचून दाखवली. म्हणाले, लोक मला शिव्या देतात. ते नेहमी रडत असतात. तुम्ही सलमान खानचा ‘तेरे नाम’ चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटात सलमान खानचं पात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ रडत असतं. तशीच आपल्या मोदींची अवस्था आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या, “मला असं वाटतं, नरेंद्र मोदींवर एक चित्रपट बनवायला हवा. त्याचं नाव ‘मेरे नाम’ असं ठेवू. लोकांना पारखण्याची मोदींची दृष्टी उच्च दर्जाची आहे. त्यांनी जगभरातून भित्रे आणि गद्दारांची फोज गोळा केली आहे. या सगळ्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आहे. हे सगळं पाहून मला भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत कार्यकर्तांची कीव येते. कारण या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी संघर्ष केला आहे.” ही टीका करत असताना प्रियांका गांधींचा काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे रोख होता.

हे ही वाचा >> ‘मूर्खांचे सरदार’ टीकेवरुन पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं उत्तर, “मला जितक्या शिव्या द्याल तितका मी…”

प्रियांका गांधी म्हणाल्या, आतापर्यंत अनेकांनी विश्वासघात केला आहे. परंतु, ग्वाल्हेर आणि चंबा मतदारसंघातील जनतेशी झालेला विश्वासघात वेदना देणारा आहे. तिथे जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. पाठीत खंजीर खूपसून तिथे आपण बनवलेलं सरकार पाडण्यात आलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi says narendra modi always crying movie should made on him named mere naam asc