Rajasthan Assembly Election 2023 : “महिलांच्या मतदानाची किंमत राजकारण्यांना कळल्यामुळे आज प्रत्येक राजकारणी महिलांबाबत बोलायला लागला आहे”, असे विधान काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी बुधवारी राजस्थानच्या झुंझुनू या ठिकाणी झालेल्या सभेत केले. राजस्थानच्या बाबतीत बोलायचे झाल्यास इथे पुरुषांपेक्षाही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. मागच्यावेळी म्हणजेच २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण महिला मतदारांपैकी ७४.६६ महिलांनी मतदानात सहभाग घेतला होता, तर पुरषांपैकी ७३.४९ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला होता. यामुळेच झुंझुनू येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून दोन नवी आश्वासने (guarantees) दिली. एक म्हणजे, प्रत्येक महिला कुटुंब प्रमुखाला वार्षिक १०,००० रुपये देण्यात येतील आणि एलपीजी सिलिंडरचे अनुदान वाढवून ५०० रुपये करण्यात येईल. राज्यातील १.०५ कोटी पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान मिळेल.
पुढील महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. आदर्श आचारसंहिता घोषित झाल्यापासून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्याचा एकदा दौरा केला आहे, तर प्रियांका गांधी वाड्रा यांनी दोन वेळा राज्याचा दौरा केला. पहिल्यांदा त्या माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या दौसा जिल्ह्यात येऊन गेल्या आणि आता त्या अशोक गहलोत यांच्यासाठी झुंझुनू जिल्ह्यात आल्या. अद्याप राहुल गांधी यांचा एकही दौरा झालेला नाही. निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात सचिन पायलट यांचा मतदारसंघ असलेल्या टोंक जिल्ह्यात सभा घेतली होती. या सभेत त्यांनी इंदिरा रसोई ग्रामीण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात माफक दरात जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे वाचा >> १९५१ ते २०१८! राजस्थानच्या निवडणुकीचा रंजक इतिहास; जाणून घ्या कोण जिंकलं, कोणाचा पराभव?
राजस्थान काँग्रेसमध्ये महिला नेत्याची वानवा
प्रियांका गांधी यांची राजस्थानमधील वाढत्या दौऱ्यांची माहिती देताना काँग्रेसचे नेते दोन प्रमुख कारणे सांगतात. पहिले कारण म्हणजे, प्रियांका गांधी या काँग्रेसमधील राष्ट्रीय नेतृत्व असलेला चेहरा तर आहेतच, त्यातच राजस्थानमध्ये काँग्रेसकडे एकही महिला नेतृत्व नाही. भाजपाप्रमाणे राज्यभरात प्रभाव पाडेल असे एकही महिला नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही. भाजपाकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासारखे नेतृत्व आहे. हल्ली त्यांचा प्रभाव कमी झाला असला तरी मागच्या दोन दशकांपासून राजस्थानमध्ये त्या भाजपाचे नेतृत्व करत आहेत. त्याचवेळी काँग्रेसमध्ये काही महिला नेत्या होत्या, पण काळाच्या ओघात त्यांना त्यांचा जिल्हा किंवा राज्यात आपल्या नेतृत्वाची छाप सोडता आली नाही.
अशोक गहलोत यांनी महिलांसाठी आखलेल्या योजना
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही योजनांची नुकतीच घोषणा केलेली होती. राज्यातील ४० लाख महिलांना मोबाइल देण्यासाठी इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना, अत्यावश्यक खाद्यपदार्थांची पाकिटे मोफत देण्यासाठी अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४८,००० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा घटस्फोटित किंवा विधवा महिलांसाठी एकल नारी सन्मान पेन्शन योजना त्यांनी सुरू केली. याचप्रकारे ५५ वर्षांवरील महिलांना सीएम वृद्धजन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ देण्यात येतो. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटरपासून ते शिष्यवृत्तीपर्यंतच्या अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो. तसेच आदिवासी, मागासवर्गीय आणि दिव्यांग असलेल्या महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा कार्यक्रम गहलोत सरकारने आखला होता.
तसेच काँग्रेस सरकारने महिलांसह समाजातील प्रत्येक घटकांसाठी योजना आणल्या आहेत. चिरंजीवी आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाचा २५ लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. मुख्यमंत्री निःशुल्क निरोगी राजस्थान योजनेमार्फत रुग्णांना मोफत औषधे आणि मोफत चाचण्या केल्या जातात. तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे हा काँग्रेस सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे.
काँग्रेसने आणलेल्या योजना आणि प्रियांका गांधी यांचे राज्यातील दौरे यावरून काँग्रेस महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत; ज्यांनी २०१८ च्या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केले होते.
हे वाचा >> राजस्थान : काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; १५ मंत्री व १५ आमदारांना पुन्हा तिकीट!
सचिन पायलट यांच्याबद्दल सहानुभूती
प्रियांका गांधी यांचे राजस्थानमधील दौरे वाढण्याचे दुसरे कारण काँग्रेस नेते सांगतात त्याप्रमाणे, सचिन पायलट यांच्याबद्दल प्रियांका गांधी यांना सहानुभूती वाटते. त्यामुळेच त्या जर राज्यात उपस्थित असतील, तर गहलोत गटाकडून पायलट यांना बाजूला सारले जाणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व हे गहलोत यांच्या बाजूने झुकलेले दिसत असताना प्रियांका गांधी मात्र आपल्या भाषणात पायलट यांचा उल्लेख करून त्यांची प्रशंसा करताना दिसतात. २०२० साली जेव्हा पायलट यांनी बंडखोरी केली होती, तेव्हाही बंड शमल्यानंतर पायलट गटासोबत प्रियांका गांधी यांचाच फोटो सर्वप्रथम समोर आला होता.
आणखी वाचा >> राजस्थान : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला झटका, ज्योती मिर्धा यांचा भाजपात प्रवेश!
निवडणूक जवळ आल्यामुळे काँग्रेसला गुर्जर मते गमवायची नाहीत. २०१८ च्या निवडणुकीत भाजपामधील अनेक गुर्जर उमेदवार विजयी झाले होते. राजस्थानमध्ये गुर्जर समाजाची लोकसंख्या सात ते आठ टक्के असून सचिन पायलट हे गुर्जर समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पायलट यांना दूर सारायचे नाही.