PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates : नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्यांच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. त्यांना मिळालेल्या संधीनंतर पुण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतो आहे. दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मंत्रीपद मिळाल्यांचा आनंद व्यक्त केला. तसेच नव्या जबाबदाराची जाणीव आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

“कार्यकर्ता म्हणून मला आनंद वाटतो आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी संघटनेत काम केलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला पुण्यातील जनतेने अनेकदा दिली आहे. आज मला नवीन जबाबदारी मिळत आहे. त्याचा आनंद आणि समाधान आहे. मात्र, दुसरीकडे या जबाबदारीची जाणीव मला आहे. हा प्रत्येक पुणेकरांसाठी सन्मान आहे. आज ३० वर्षांनंतर पुण्याला केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळते आहे”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुढे बोलताना, “मला मंत्रीमंडळात स्थान मिळेल हे अनपेक्षित होतं. मात्र, पक्षाने मला ही संधी दिली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी दिली आहे. या सगळ्यांचा मी आभारी आहे. विशेषत: मी पुणेकराचे धन्यवाद देतो, की त्यांनी मला निवडून दिले. मला काम करायची संधी दिली”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.