पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी भैय्या उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या वक्तव्यावरुन निशाणा साधला असून हे खूपच लाजिरवाणं असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं वक्तव्य चरणजीत सिंग चन्नी यांनी केलंआहे. विशेष म्हणजे यावेळी प्रियंका गांधी त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. या वक्तव्यावर त्यांनीदेखील हास्यमुद्रा देत टाळ्या वाजवल्या.
अरविंद केजरीवाल यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “हे खूप लाजीरवाणं आहे. आम्ही कोणत्याही व्यक्ती आणि समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. प्रियंका गांधीही उत्तर प्रदेशच्या आहेत त्यामुळे त्यादेखील भैय्या आहेत,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
“उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका”; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने गदारोळ
पंजाबच्या रुपनगरमध्ये काँग्रेसच्या प्रचारसभेदरम्यान चरणजीत सिंग चन्नी यांनी हे वक्तव्य केलं. १५ जानवेरीला पार पडलेल्या या प्रचारसभेत प्रियंका गांधी उपस्थित होत्या.
पंजाबला पंजाबीच चालवणार – प्रियंका गांधी
प्रियंका गांधी यांनी यावेळी संबोधित करताना म्हटलं की, “हुशारी दाखवा. निवडणुकीची वेळ आहे, त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. पंजाबच्या लोकांनो तुमच्यासमोर जे आहे त्याला ओळखा”. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “पंजाबला पंजाबीच चालवणार. जे बाहेरुन येता त्यांना पंजाबी काय असतो दाखवून द्या. माझं सासरही पंजाब आहे”.
यानंतर चन्नी यांनी माइक हाती घेतला आणि म्हटलं की, “प्रियंका पंजाबच्या सून आहेत. युपीचे, बिहारचे, दिल्लीचे भैय्ये येथे येऊन राज्य करु शकत नाही. युपीच्या भैय्यांना पंजाबमध्ये फिरु देता कामा नये”. यावेळी प्रियंका गांधी हसत होत्या तसंच लोकांसोबत ‘बोले सो निहाल’ ची घोषणा देत होत्या.