२०२० साली दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर केजरीवाल यांच्याप्रमाणे दिसणारी वेशभूषा केलेला छोटा केजरीवाल म्हणून एका मुलाचे फोटो व्हायरल झाले होते. यंदा पंजाबमध्ये आपने सत्ता मिळवल्यानंतर पुन्हा एकदा या छोट्या केजरीवालची चर्चा आहे. पण यंदा जो केजरीवाल म्हणून नाही तर भगवंत मान म्हणून समोर आलाय. भगवंत मान हे आपचे पंजाब निवडणुकीमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते म्हणून पंजाबमधील ऐतिहासिक विजय या चिमुकल्याने भगवंत मान बनून साजरा केलाय.
डोक्यावर भगवंत मान यांच्याप्रमाणे पिवळी पगडी, मरुन रंगाचं स्वेटर, काळं मफलर, छोटीशी मिशी आणि डोळ्यावर चष्मा अशा रुपामध्ये हा छोटा केजरीवाल म्हणजेच अव्यान तोमर दिसून आला. त्याच्या भोवती फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मात्र तो सुद्धा छान पोज देत अनेकांना फोटो काढू देत होता. २०२० च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील आपच्या मुख्यालयामध्येही या छोट्या केजरीवालबरोबर फोटो काढण्यासाठी आप समर्थकांची आज ज्याप्रमाणे चढाओढ सुरु आहे तशीच चढाओढ सुरु होती.
कोण आहे हा छोटू नक्की आहे तरी कोण?
आपच्या मुख्यालयाबरोबरच सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरलेलेला ‘छोटा केजरीवाल’ आणि आता ‘छोटा भगवंत मान’चं खरं नाव आहे अव्यान तोमर. अव्यान अगदी एका वर्षाचा असताना दिल्लीत आपच्या विजयाचं सेलिब्रेशन करायला गेलेला. आयन आता तीन वर्षांचा आहे. त्याचे वडील राहुल तोमर आणि आई मिनाक्षी दोघेही आपचे मोठे समर्थक आहेत. “केवळ मी नाही तर माझे संपूर्ण कुटुंबातील सर्वच सदस्य अरविंद केजरीवाल यांचे चाहते आहेत. आम्ही त्यांच्या विचारांनुसार वागण्याचा आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो,” असं राहुल सांगतात. २०१५ मध्ये केजरीवाल दुसऱ्यांदा विजयी झाले होते त्यावेळी अव्यानच्या मोठ्या बहिणीला केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन आपच्या कार्यालयात गेली होती असं राहुल यांनी सांगितलेलं. त्यावेळी ती केवळ पाच वर्षांची होती. अव्यानला केजरीवाल यांच्यासारख्या लूक देण्यामागे त्याची आई मिनाक्षीचा मोठा हात असल्याचं राहुल यांनी म्हटलेलं. अव्यानला दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी विशेष आमंत्रणही देण्यात आलं होतं.
“आता आमची मुले लहान आहेत पण त्यांच्या डोक्यात राजकारणाबद्दल एक प्रतिमा तयार होत आहे. मागच्या वेळी माझी मुलगी केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन गेली होती तेव्हा त्यांनी तिचे कौतुक केलं होतं,” असंही राहुल म्हणाले होते. केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य श्रेत्रात केलेल काम कौतुकास्पद असल्याचंही राहुल म्हणाले होते.