पंजाब, उत्तर प्रदेश, गोवासह पाच राज्यात पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांची आणि नेत्यांची संख्या वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये या आठवड्यात अवघ्या तीन दिवसांत सात भाजपा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पार्टीसह इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. पंजाबही याला अपवाद नाही. पंजाबमध्ये अनेक नेते पक्ष बदलत आहेत. त्यातच आता आणखी एका नेत्याने तब्बल ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. जोगींदर मान असं या नेत्याचं नाव आहे.

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जोगींदर मान यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या एका दिवसानंतर शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी पक्षाशी असलेले त्यांचे ५० वर्षांचे संबंध तोडले आहेत.

आपचे आमदार आणि पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी जोगींदर मान यांचं पक्षात स्वागत केलं. ते म्हणाले की, मान यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या आप प्रवेशामुळे राज्यात पक्षाला मोठी चालना मिळेल. चढ्ढा यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय.

जोगींदर मान हे पंजाबमधील अनुसूचित जातीचे नेते आहेत. ते शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल पंजाबमधील काँग्रेस सरकारवर नाराज होते. फगवाडा या त्यांच्या मतदारसंघाला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेही सरकारविरोधात नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आम आदमी पक्षात प्रवेश केला.

Story img Loader