पंजाब वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्यांवर मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकांवर हे छापे टाकण्यात आले. चन्नी यांनी निदर्शने संचालनालयाने टाकलेले छापे हे सूडाची कृती असल्याचे म्हटले आणि ईडी, आयकर विभाग आणि इतर संस्थाचा केंद्र सरकार वापरत असल्याचा आरोप केला.
याप्रकरणी मुख्यमंत्री चन्नी यांनी पलटवार करत केंद्र सरकार आणि भाजपाला घेरले. आपल्या पुतण्याचा बचाव करताना चन्नी म्हणाले, “पश्चिम बंगाल असो किंवा पंजाब, या राज्यांमध्ये क्रांती सुरू झाली. दिल्ली आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण पंजाब त्याचा बदला घेईल.”
“मला, ईडीने पंतप्रधान मोदींची फिरोजपूर भेट विसरू नका, असे म्हटल्याचे कळले आहे. या छाप्यातून सूड उगवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. माझ्या पुतण्याला अडकवण्यासाठी २४ तास चौकशी करण्यात आली, पण ईडीला माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही,” असे चन्नी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री चन्नी यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. “केजरीवाल जी, तुमच्या नातेवाईकावर छापा टाकला तेव्हा तुम्ही का ओरडत होता?, असे चन्नी म्हणाले. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने या छापेमारीवरून चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत चन्नी हे सामान्य माणूस नाहीत, ते एक बेईमान व्यक्तिमत्व आहे, असे म्हटले होते.
त्याचवेळी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांनीही भाजपावर निशाणा साधला. “त्यांना (भाजपा) पंजाबची बदनामी करायची आहे का? मला माहित नाही की तिथे शेतकरी होते की नाही. मात्र तिथे भाजपचे झेंडे होते. ब्रिटीश राजवटीत पंजाबींनी बलिदान दिले. भाजपाचे योगदान काय आहे?,” असा सवाल रंधावा यांनी केला.
अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सुमारे १० ठिकाणी छापे टाकले. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरावर हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकाकडून जप्त केलेल्या आठ कोटींसह आतापर्यंत १० कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीनंतर पंजाबमध्ये राजकारण तापले आहे.