पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये सत्तेचा सारीपाट रंगणार आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे ही निवडणूक पंचरंगी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी यांनी मान यांना खोचक शब्गांमध्ये टोला लगावला आहे.
पंजाब निवडणुकांसाठी अमृतसरमध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलताना मान यांनी काँग्रेसचा उल्लेख सर्कस असा केला होता. “काँग्रेस पक्ष आता पंजाबमध्ये एक सर्कस बनला आहे. चन्नीसाहेबांचा ते लढत असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव होणार आहे. आप त्यांचा पराभव करेल. ते जर आमदारच नसतील, तर ते कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत”, असं मान म्हणाले होते.
“जर काँग्रेस सर्कस असेल तर…”
दरम्यान, मान यांच्या टीकेला चरणजीत सिंग चन्नी यांनी एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “ही जर आमची सर्कस असेल, तर तिथे माकडाची जागा रिकामी आहे. त्यासाठी त्यांचं (भगवंत मान) स्वागत आहे. त्यांना दिल्लीतून, हरयाणामधून किंवा उत्तर प्रदेशमधून दाखल व्हायचं असेल तरी ते होऊ शकतात”, असं चन्नी म्हणाले.
पंजाब आणि खेळ!
दरम्यान, चन्नी यांनी यावेळी पंजाब आपसोबत खेळत असल्याचं म्हटलं. “पंजाब फक्त आपसोबत खेळत आहे. पंजाब इतर कुणाबरोबरही जाणार नाही”, असं ते म्हणाले. आपला ‘काले अंग्रेज’ अशी उपमा देत चन्नी यांनी “हे ब्रिटिश पंजाबला लुटण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं चन्नी म्हणाले.