पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये २०१४ च्या एका घटनेवरुन काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या युवराजांमुळे अमृतसरवरुन उड्डाण करत असताना माझे हेलिकॉप्टर पंजाबमध्ये रोखण्यात आले होते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधत पंजाबमधील जालंधर मध्ये मंचावरून एक किस्सा सांगितला. यामध्ये राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी टोमणा मारला.

“हे लोक कसे आहेत? त्यांचे चारित्र्य कसे आहे? मी तुम्हाला सांगतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुका होत्या. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि भाजपाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. निवडणूक प्रचारासाठी मी देशभर फिरत होतो. राज्याचा मुख्यमंत्री असल्याने गुजरातचे कामही करत होतो,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला.

“एक दिवस असं झालं की मला पठाणकोठला यावं लागलं आणि इथून मला हेलिकॉप्टरने हिमाचल प्रदेशला जायचं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल. काँग्रेसचे नामदार, त्यांचे युवराज, जे फक्त पक्षाचे खासदार होते बाकी काही नाही. त्या दिवशी त्यांचाही अमृतसरच्या आसपास काही कार्यक्रम होता. त्या दिवशी माझे हेलिकॉप्टर उडू दिले नाही. पठाणकोठला पोहोचायला मला दीड तास उशीर झाला. पठाणकोठला पोहोचल्यावर माझ्या हेलिकॉप्टरला पुन्हा उड्डाण करू दिले नाही. कारण काँग्रेसच्या युवराजांना पंजाबच्या अन्य भागात जायचे होते. त्यामुळे मला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. मला हिमाचल प्रदेशातील दोन्ही कार्यक्रम रद्द करावे लागले. अशा सत्तेचा दुरुपयोग एकाच कुटुंबातील लोकांनी केला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला चंदीगडच्या राजेंद्र पार्कवरून उड्डाण करण्याची परवानगी नाकारल्याचा आरोप केल्यानंतर पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान ‘नो फ्लाय झोन’मुळे हे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधींच्या निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी चन्नी होशियारपूरला जाणार होते, मात्र राहुल यांच्या हेलिकॉप्टरला होशियारपूरमध्ये उतरण्याची परवानगी देण्यात आली.

“मी सकाळी ११ वाजता उनामध्ये होतो पण पंतप्रधान मोदींच्या रॅलीमुळे अचानक मला (होशियारपूरला) उड्डाण करण्याची परवानगी मिळाली नाही. होशियारपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला मी उपस्थित राहू शकलो नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

जालंधरमधील रॅलीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी भाषणात गांधी कुटुंबावर निशाणा साधला. “काँग्रेसची सरकारे एका कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलने चालवली जातात. आज काँग्रेसची अवस्था बघा. हा पक्ष तुटत चालला आहे, त्यात त्यांचेच नेते हे उघड करत आहेत. ज्या पक्षात इतकी अंतर्गत भांडणे आहेत, तो पक्ष पंजाबला स्थिर सरकार देऊ शकत नाही. रविवारी पंजाब नव्या सरकारसाठी मतदान करणार आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Story img Loader