पंजाबमधील ११७ जागांवर होत असलेल्या विधान सभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान निवडणूक आयोगाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान मोगा जिल्ह्यात संशयास्पद हालचाली होत असल्याच्या वृत्तानंतर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एक एसयूव्ही गाडी जप्त केली ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूद बसला होता. अधिकाऱ्यांनी सोनू सूदची गाडी जप्त केली आणि त्याला दुसऱ्या वाहनातून घरी पाठवले आणि त्याला घरीच थांबण्याची सूचना केली. या कारवाईमुळे उर्वरित उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर या मोगा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेवरून हे वाहन जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यासोबतच अधिकारी सतवंत सिंग यांनीही सोनू सूदच्या घराची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोनू सूद मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार अकाली दलाचे पोलिंग एजंट दीदार सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने सोनू सूदचा पाठलाग केला आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे. सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून बहिणीसाठी प्रचार करत आहे.
या कारवाईवर सोनू सूदने स्पष्टीकरण दिले आहे. सोनू सूदचे म्हणणे आहे की, त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याने कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकला नाही. मी फक्त माझ्या समर्थकांकडून अहवाल घेत होतो, असे सोनू सूदने म्हटले.
“विरोधकांकडून, विशेषत: अकाली दलाच्या लोकांकडून विविध बूथवर धमक्या आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही बूथवर पैसे वाटले जात आहेत. त्यामुळे तपास करणे आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही बाहेर पडलो होतो. आता, आम्ही घरी आहोत. निवडणुका निष्पक्ष होऊ द्या,” असे सोनू सूद म्हणाला.
दरम्यान, शहर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर दविंदर सिंग म्हणाले की, “संशयास्पद हालचालींच्या आधारावर एसयूव्ही जप्त करण्यात आली आहे. गावाच्या मतदान केंद्राजवळ एसयूव्ही फिरत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. त्यावर आम्ही कारवाई केली आहे. पुढील कारवाई केली जात आहे.”