पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेतली. पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक सरकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे छायाचित्र लावण्यात येईल, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. २६ जानेवारी रोजी देखील केजरीवाल यांनी दिल्लीत तशी घोषणा केली होती.
आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यासोबत अमृतसर येते पत्रकारपरिषदेत बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, “आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे झाली आहेत. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. अनेकांनी बलिदान दिलं होतं, कोणालाही कमी लेखू शकत नाही.” केजरीवाल पुढे म्हणाले, “ मात्र तरी देखील जेवढ्या जणांनी बलिदान दिलं त्या सर्वांवर एकदा नजर टाकली तर दोन व्यक्तिमत्व अशी दिसून येतात जी संपूर्ण चळवळीचे प्रतिनिधित्व करतात ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग.”
तसेच, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असं देखील अरविंद केजरीवाल यांनी या अगोदर जाहीर केलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे.
“जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील. एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.” असं केजरीवाल म्हणाले होते.