पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आलेला आहे, तर नेते मंडळींचे आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. कुमार विश्वास यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल हे पंजाबमध्ये फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप प्रसिद्ध कवी आणि पूर्वाश्रमीचे आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे.
कुमार विश्वास म्हणाले की, “ अरविंद केजरीवाल यांना हे समजलं पाहिजे की, पंजाब हे केवळ एक राज्य नाही एक भावना आहे. मी त्यांना अगोदर सांगितले होते की, फुटीरतावादी आणि खलिस्तानी संघटनांशी निगडीत लोकाची मदत घेऊ नका. मागील निवडणुकीत. तर त्यांनी म्हटलं होतें की नाही-नाही होऊन जाईल, चिंता करू नकोस आणि मुख्यमंत्री कशाप्रकारे बनता येईल, याचा फॉर्म्युला देखील सांगितला होता. आज देखील ते त्याच मार्गावर आहेत. ते काहीही करतील. त्यांनी मला एवढ्या भयानक गोष्टी सांगितल्या ज्या पंजाबमध्ये सर्वांना माहीत आहे, कोणत्याही परिस्थिती मला सत्ता हवी हेच त्यांच्या डोक्यात असते.”
तसेच, “ एक दिवस त्यांनी(केजरीवाल) मला म्हटले होते की, ते एक तर (पंजाबचे) मुख्यमंत्री बनतील, नाही तर स्वतंत्र राष्ट्राचे (खलिस्तानचे) पहिले पंतप्रधान होतील.” असंही कुमार विश्वास यांनी सांगितलं आहे.
तर, “ २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील. एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.” असं केजरीवाल यांनी जाहीर केलेलं आहे.
सहसा संसदीय लोकशाहीमध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री ठरवला जातो. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांकडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येते. सर्वसाधारणपणे विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री ठरवण्याची ही पद्धत. मात्र पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेतला. त्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला राज्यातील सर्व ११७ जागांसाठी मतदान होत आहे.