पंजाबमधील दारूण पराभवानंतरही काँग्रेस आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात गुंतलेली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ९३ जागांवर विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची १७ जागांवर घसरण झाली आहे. या पराभवासाठी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला किंवा अन्य कोणत्याही नेत्याला दोष दिलेला नाही. तर या पराभवाचे खापर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर फोडले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग हे साडेचार वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि जनता त्यांच्यावर नाराज होती. कॅप्टन यांच्या कारभारामुळे सत्ताविरोधी वातावरण होते आणि त्यामुळे आम्ही जनतेला समजावून घेऊ शकलो नाही, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. आपण निवडणूक हरलेलो असू, पण हिंमत हारलेली नाही. आम्ही सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही सुरजेवाला म्हणाले.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “आम्ही गोवा आणि उत्तराखंडमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढलो, पण जनतेला पटवून देऊ शकलो नाही. धार्मिक प्रश्न सोडून जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला. शिक्षण, आरोग्य या सर्व गोष्टींवर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पण भावनिक प्रश्नांनी जनमानसाचा ताबा घेतला आहे. निवडणुकीत आम्ही जिंकलो किंवा हरलो, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही काम करत राहू. आम्ही आत्मपरीक्षण करू आणि पराभवाच्या कारणांवर विचार करू. लोकांसाठी काम करणार आणि भविष्यात अधिक चांगल्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निकालांनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला आहे की केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाईल, ज्यामध्ये पराभवाचा आढावा घेतला जाईल.”
एकीकडे रणदीप सुरजेवाला यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर पराभवाचे खापर फोडले, तर दुसरीकडे सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत धडा घेण्याचे संकेतही दिले. या पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होऊ शकते, हेही यातून स्पष्ट झाले आहे. या निकालानंतर पंजाबमध्येही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. याचे कारण म्हणजे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे.