निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी ही मतदानाची तारीख घोषित केलेली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, राज्यातील सर्व ११७ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आता निवडणूक आयोगाला ही निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली आहे, त्यासाठी त्यांनी आयोगाला पत्रही लिहिले आहे.
निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुरु रविदास जयंतीचा हवाला देत १४ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित पंजाब विधानसभा निवडणुकीचे मतदान किमान सहा दिवस पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री गुरु रविदास यांची जयंती आहे, या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसीला जातात. अशा स्थितीत १४ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने लोक मतदानापासून वंचित राहू शकतात.
मुख्यमंत्र्यांनी आयोगाला पत्र लिहिले –
ते म्हणाले की, संत रविदास जयंतीनिमित्त १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुमारे २० लाख भाविक वाराणसीला जाणार आहेत. या संदर्भात त्यांची दलित समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन निवडणुकीची तारीख अशा प्रकारे ठेवण्याची विनंती केली की, संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमातही त्यांना सहभागी होता येईल आणि मतदानाचा हक्क देखील बजावता येईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे.
त्यांनी हे पत्र १३ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाला लिहिले होते, जे १५ जानेवारी रोजी समोर आले आहे, तर काँग्रेसनेही आगामी निवडणुकीसाठी शनिवारी ८६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सीएम चरणजीत सिंग चन्नी यांना चमकौर साहिबमधून उमेदवारी दिली आहे, तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. १० मार्च रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहे.