पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार होती. परंतु मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादात एकमत होऊ शकले नाही. अखेर या वादात हस्तक्षेप करत काँग्रेस हायकमांडने एक उपसमिती स्थापन केली असून, ही समिती या जागांसाठीच्या उमेदवारांची नावे ठरवणार आहे. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस केके वेणुगोपाल यांच्यासह अंबिका सोनी आणि अजय माकन यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी काँग्रेसने ८६ उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. दुसऱ्या यादीत सहा आमदारांची तिकिटे कापण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने नाराज नेत्यांची मनधरणी केल्याने काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्यास विलंब होत आहे. दुसऱ्या यादीतील अनेकांची नावेही बदलण्याची शक्यता आहे. याचे कारण निवडणुकीच्या काळात पक्षात फूट पडावी, असे हायकमांडलाही वाटत नाही.
विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत. त्याचवेळी पंजाब काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद सुरूच आहेत. काँग्रेसने पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांकडून बंडखोरीचा सूर आळवण्यास सुरूवात झाली आहे. आता निवडणूक जाहीरनाम्यावरुन पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत.
सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उमेदवार आणि तिकीट दावेदारांनी काही स्थानिक मुद्दे जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याची सूचना काँग्रेस हायकमांडला केली होती. मात्र, राज्यातील सर्व जनतेला फायदा होईल, अशाच मुद्द्यांचा निवडणूक जाहीरनाम्यात समावेश केला जाईल, असा युक्तिवाद करून पक्षाने त्यांच्या सूचना फेटाळून लावल्या. तर, स्थानिक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी विजयी उमेदवारांवर राहणार आहे.
सिद्धू आणि चन्नी यांच्यातील मतभेदांमुळे निवडणुकीची रणनीती आखणेही कठीण होत आहे. याच कारणामुळे चन्नी यांच्या भावाचे तिकीट कापण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते व्हीआरएस घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, मात्र अखेरच्या प्रसंगी एक कुटुंब एक तिकिटाच्या नावाने त्यांचे तिकीट नाकारण्यात आले.