पंजाब विधानसभा निवडणुकीची लढत खूपच रंजक बनली आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि भाजपासह इतर पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांसारखे पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ वॉरचा वापर करत आहेत. यामध्ये, आता एक नवीन व्हिडिओ समोर आणत काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना सुपरहिरो थॉरच्या भूमिकेत दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह अन्य नेते दिसत आहेत.
हा व्हिडिओ पंजाब काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आमच्या पंजाब आणि तेथील जनतेला वाईट शक्तींच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी जे काही करायचे आहे ते आम्ही करू, असे कॅप्शन यामध्ये लिहिले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये फेस एडिटचा वापर करण्यात आला असून मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा चेहरा थॉरच्या चेहऱ्यावर लावण्यात आला आहे. काँग्रेस नेते सुनील जाखर, राहुल गांधी आणि नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांचे सहकारी म्हणून दाखवले आहेत.
व्हिडिओमध्ये चन्नी थॉरच्या रूपात प्रवेश करताच ते त्यांच्या शत्रूंना सांगतात की, आता तुम्ही वाचणार नाही, कुठे गेले केजरीवाल आणि मोदी. यानंतर विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान मोदी, अरविंद केजरीवाल, अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग शस्त्रे घेऊन उडताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. पंजाबच्या या निवडणुकीत व्हिडिओच्या माध्यमातून विरोधी पक्षावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘आप’ने आपले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांची शाहरुख खानच्या भूमिकेत दाखवले होते. या व्हिडिओमध्ये ‘हे बेबी’ या बॉलीवूड चित्रपटातील दिल दा मामला हे गाणे फेस एडिटसह दाखवण्यात आले आहे. यामध्ये भगवंत मान यांच्याशिवाय राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, नवज्योत सिंग सिद्धू आणि चन्नी यांनाही दाखवण्यात आले होते.