काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वत:ची राजकीय संघटना जाहीर केली. त्यानंतर त्यांनी भाजपासोबत युती करत ३७ जागा लढवण्याचं ठरवलं आहे. मात्र त्यांना या जागांसाठी पुरेसे उमेदवार मिळवत नाहीयेत.
सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (PLC) ने त्याचे सरचिटणीस कमलदीप सिंग सैनी यांच्यासह किमान पाच नेत्यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिलं आहे आणि योग्य व्यक्ती न मिळाल्याने त्यांना दिलेल्या तीन जागा परत द्याव्या लागल्या आहेत, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा आहेत.
काँग्रेस सोडल्यानंतर सिंग यांनी वारंवार दावा केला होता की निवडणुकीच्या जवळ काँग्रेसमधून आणखी अनेक नेते पीएलसीमध्ये जातील. मात्र, तसे झालेले नाही. त्यांच्या पक्षातले पीएलसी चिन्हापेक्षा भाजपाला पसंती देतील हे मात्र सिंग यांच्यासाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. सिंह यांनी २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला ७७ जागांवर विजय मिळवून दिला होता.
ही निवडणूक पहिलीच आहे की भाजप पंजाबमध्ये २२-२३ पेक्षा जास्त मतदारसंघ लढवत आहे. यावेळी भाजपच्या चिन्हावर ७१ उमेदवार लढत आहेत. २ नोव्हेंबर रोजी काँग्रेस सोडल्यानंतर सिंग यांना पहिला धक्का बसला, तो त्यांचा सर्वात ज्येष्ठ सहकारी राणा गुरमित सिंग सोधी यांनी पीएलसीऐवजी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.