मी जे मुद्दे भाषणात बोलतो, तेच मुद्दे पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात बोलतात. त्याच त्या गोष्टी परत परत सांगतात. कदाचित त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यांचं वागणं बघून अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची आठवण येते. तेही अनेकदा गोष्टी विसरायचे. पंतप्रधान मोदीसुद्धा आता त्याच मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच धारावीची जागा अदाणींना देण्याचा बदल्यात आमदार विकत घेण्याचा सौदा झाला आणि त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, आरोपही त्यांनी केला. अमरावतीत आज राहुल गांधी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपाला लक्ष्य केलं.
काय म्हणाले राहुल गांधी?
“आम्ही बोलतो तेच गोष्टी पंतप्रधान मोदी बोलतात. त्याच त्या गोष्टी परत परत सांगतात. त्यांना आता स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यांचं वागणं बघून अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची आठवण येते. तेही अनेकदा गोष्टी विसरायचे, त्यांच्या बाजुला असलेल्या व्यक्तीला त्यांना आठवण करून द्यावी लागत होती. एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी त्यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून संबोधले. नंतर अधिकाऱ्यांनी ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे त्यांना सांगितलं. आता पंतप्रधान मोदीही याच मार्गाने जात आहेत”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा – ‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
“पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करतात. ज्यावेळी महाराष्ट्रातील सरकार चोरी करण्यात आलं. तेव्हाही अशाचप्रकारे बंद खोलीत बैठक पार पडली होती. या बैठकीला अदाणी, अमित शाह होते. या बैठकीत धारावीच्या जागेच्या बदल्यात आमदार विकत घेण्याचा सौदा झाला आणि राज्यातील जनतेचं सरकार पाडण्यात आलं. अशाप्रकारे हे लोक संविधानाचं रक्षण करतात का? अशाप्रकारे सरकार पाडा असं संविधानात लिहिलं आहे का? मुळात हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. धारावीची एक लाख कोटीची जमीन त्यांना अदाणींना द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात आलं”, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा – छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांचा घणाघात
दरम्यान, राहुल गांधी भरसभेत जे संविधान दाखवतात ते कोरं असल्याचा पंतप्रधान मोदी म्हणले होते. या आरोपालाही राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. “पंतप्रधान म्हणतात की मी जे पुस्तक दाखवतो, ते रिकामं आहे. यात काही लिहिलेलं नाही. पण हे पुस्तक केवळ संघाच्या कार्यकर्त्यांसाठी रिकामं आहे. भाजपासाठी रिकामं आहे. आमच्यासाठी संविधान हे देशाचा डीएनए आहे. यात आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्ध, नारायण गुरू, बसवण्णा, महात्मा गांधी यांचे विचार आहेत. हे आमच्यासाठी नवं पुस्तक नाही. तर हा हजारो वर्षांपासूनच्या विचारधारेचा दस्ताऐवज आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.