काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राहुल गांधी यांना यंदा रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे सोनिया गांधी यांनी खासदार होत्या. परंतु, त्यांची वर्णी राज्यसभेत लागल्याने या जागेवरून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी हे प्रवासी आहेत. ते जागा बदलत राहतात. आपल्या देशात प्रवाशांचं स्वागत केलं जातं. पण तिथं त्यांचं घर तयार होत नाही. ते अमेठी किंवा रायबरेलीत गेले तरी त्यांची परिस्थिती सारखीच राहणार आहे.” देवेंद्र फडणीसांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
गेली दोन दशके सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी होत होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीतून निवृत्ती घेतल्याने ही जागा रिक्त झाली होती. प्रियंका गांधी-वाड्रा यांनी नकार दिल्याने राहुल गांधी यांनी अखेरच्या क्षणी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा >> सोनिया गांधींकडून अमेठीप्रमाणे रायबरेलीही राहुलना आंदण
२०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी रायबरेलीतून सोनिया गांधी विजयी झाल्याने काँग्रेसला एक तरी जागा जिंकता आली. अमेठीतून राहुल गांधी यांना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींनी पराभूत केले होते. यावेळीही राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र, राहुल गांधींनी जिंकण्यासाठी तुलनेत सोपा असलेला रायबरेलीचा मतदारसंघ निवडला. त्यामुळे अमेठीवासी गांधी कुटुंबाविना लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवाय, २०१९ मध्ये अमेठीवर इराणींनी कब्जा केल्यामुळे ही जागा गांधी कुटुंबाची राहिली नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
स्मृती इराणी काय म्हणाल्या?
रायबरेलीतून राहुल गांधींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “अमेठीतून लढणाऱ्या पाहुण्या उमेदवारांचं मी स्वागत करते. अमेठीतून गांधी कुटुंबातल्या कुणीही न लढणं याचाच अर्थ काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. निवडणूक होण्याआधी, मतं मिळण्याआधीच काँग्रेस पक्ष पराभूत झाल्याच्या मानसिकतेत गेला आहे. जर राहुल गांधींना हे वाटत असतं की आपण निवडणूक जिंकणार तर ते अमेठीतून उभे राहिले असते.”
हेही वाचा >> राहुल गांधींची जळजळीत प्रतिक्रिया, “प्रज्ज्वल रेवण्णा ‘सामूहिक बलात्कारी’, या प्रकरणात पंतप्रधान मोदींनी..”
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुका लागायच्या दोन महिने आधीच मी सांगितलं होतं की, यांच्या सर्वात मोठी नेत्या निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नाहीत. त्या घाबरून पळून जाणार. त्या पळून राजस्थानात गेली आणि राजस्थानातून राज्यसभेत आल्या. आता राहुल गांधी यांनीही अमेठीऐवजी रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. “मी आधीच सांगितलं होतं की यांचे युवराज वायनाडमध्ये हरणार आहेत. आणि हरण्याच्या भितीने वायनाडमध्ये मतदान संपल्यावर ते तिसरी जागा शोधायला सुरुवात करतील.”