Caste Census in Telangana : देशाच्या राजकारणात जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा तापला आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी तेलंगणातील जनतेला आश्वासन दिलं आहे की आमचा पक्ष (काँग्रेस) सत्तेत आला तर आम्ही तेलंगणात जातीनिहाय जनगणना करू. देशात तेलंगणा, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसह सगळे पक्ष निवडणुकीचा प्रचार करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आज तेलंगणात काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसने तेलंगणात ‘विजयभेरी’ यात्रा सुरू केली आहे. राहुल गांधी या ‘विजयभेरी’ यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, जातीनिहाय जनगणना हा देशातला सर्वात मोठा मुद्दा आहे. जातीनिहाय जनगणना म्हणजे एक ‘एक्स रे’ आहे जो दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या स्थितीवर प्रकाश टाकेल. देशातला निधी कोणत्या आधारावर वितरित केला जातोय, तेदेखील या माध्यमातून सर्वांच्या समोर येईल.
सभांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, देशातील सर्वात मोठा मुद्दा जातीनिहाय जनगणनेचा आहे. याचे वर्णन “एक्स-रे” असे करून राहुल गांधी म्हणाले, ह एक्स रे दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या स्थितीवर प्रकाश टाकेल. देशाचा निधी कोणत्या आधारावर वितरित केला जातो हे देखील यातून समजेल.
राहुल गांधी यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना प्रश्न विचारायला हवेत. यासह राहुल गांधी म्हणाले, तेलंगणात आमची सत्ता आल्यावर सर्वप्रथम आम्ही राज्याचा एक्स रे काढू. छत्तीसगड, राजस्थान आणि कर्नाटक या देशातील काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यास सांगण्यात आलं आहे.
राहलु गांधी म्हणाले, तेलंगणातील लोकांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावीच लागेल. मी तुम्हाला वचन देतो की तेलंगणात काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला आहे.