लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल आज जाहीर झाले. ५४२ जागांसाठी मतमोजणी पार पडली. यापैकी काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत, तर काही ठिकाणी मतमोजणी चालू आहे. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना जनतेने नाकारल्याचं पाहायला मिळालं. देशातील सर्वात चर्चेतल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे उत्तर प्रदेशमधील अमेठी होय. २०१९ मध्ये अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. आता पाच वर्षांनी त्याच मतदारसंघातून काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मांनी इराणींना पराभूत केलं आहे.
अमेठी लोकसभा मतदारसंघातील लढाई भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. आज सकाळी मतमोजणी चालू झाल्यापासूनच स्मृती इराणी पिछाडीवर होत्या. ती पिछाडी सर्व फेऱ्यांमध्ये कायम राहिली आणि काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मांनी विजय मिळवला. निवडणुकांच्या निकालाबद्दल काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमेठीतील विजयी उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्याबद्दल राहुल गांधींना विचारण्यात आलं, त्यावर ते काय म्हणाले, जाणून घेऊयात.
राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”
‘अमेठीत राहुल गांधींनी आपल्या पीएला निवडणुकीत उभं केलं, असं भाजपाने म्हटलं होतं, आज त्याच किशोरी लाल शर्मांनी त्यांना हरवलं,’ असं पत्रकार परिषदेत विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, “भाजपा लोकांचा आदर करत नाही, आदराने बोलत नाहीत. किशोरी लाल शर्मा हे ४० वर्षांपासून अमेठीत काँग्रेससाठी काम करत आहेत आणि त्यांचं अमेठीच्या जनतेबरोबर नातं आहे. कदाचित भाजपाच्या लोकांना ही गोष्ट समजली नाही की किशोरी लाल शर्मा हे अमेठीशी खूप चांगल्या रितीने जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की ते चांगल्या फरकाने जिंकले आहेत. ते पीए आहेत असं त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, त्यांनी या गोष्टी म्हणायला नको होत्या.”
“मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
काँग्रेसचे किशोरी लाल शर्मांनी यांनी स्मृती इराणी यांचा तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभव केला आहे. स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदरासंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या उमेदवाराने अमेठीत स्मृती इराणींना पराभूत करत निवडणूक जागा जिंकली.