काही महिन्यांपूर्वी तेव्हा काँग्रेसमध्ये असणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याच्या आधीपासूनच नवज्योत सिंग सिद्धू यांच्या रुपानं काँग्रेसमध्ये वादळ उठलं होतंच. त्यात अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे तेल ओतलं गेलं. अखेर काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं होतं, असं स्पष्ट केलं आहे. तसेच, त्यांना का हटवण्यात आलं होतं, हे देखील राहुल गांधींनी सांगितलं आहे.
तो राजीनामा नव्हे, पक्षांतर्गत कारवाईच!
राहुल गांधींनी पंजाबच्या फतेगड साहिबमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावेळी नेमकं काय झालं होतं, याविषयी जाहीरपणे माहिती दिली आहे. सर्वात पहिली बाब म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याचं आत्तापर्यंत सर्वश्रुत असताना राहुल गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तो राजीनामा नसून ती पक्षांतर्गत कारवाई होती, असं आता स्पष्ट झालं आहे.
काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर आणि विशेषत: शीर्ष नेतृत्वावर टीका करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं. “पक्षात आपला वारंवार अपमान केला जात आहे”, असं तेव्हा अमरिंदर सिंग म्हणाले होते. यानंतर आता राहुल गांधींनी अमरिंदर सिंग यांना पदावरून का काढण्यात आलं, याचं कारण सांगितलं आहे.
“मी तुम्हाला सांगतो की कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून नेमकं का काढण्यात आलं होतं. त्यांना काढलं कारण ते लोकांना मोफत वीज पुरवायला तयार नव्हते. ते म्हणाले माझं वीज कंपन्यांशी काँट्रॅक्ट झालं आहे”, असा खुलासा राहुल गांधींनी केला आहे.