Rahul Gandhi on Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व भारतीय जनता पक्षाप्रमाणचे राज्यातील इतर सर्वच पक्षांकडून आक्रमक प्रचार केला जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर असल्याचं दिसून येत आहे. त्यातच काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कटेंगे तो बटेंगे व एक है तो सेफ है या सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवरून टीका केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत चक्क तिजोरी आणल्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

काय म्हणाले राहुल गांधी?

“महाराष्ट्राची निवडणूक विचारसरणीची निवडणूक आहे. एकदोन अतीश्रीमंत आणि गरीबांमध्ये ही निवडणूक आहे. अरबपतींना वाटतं की मुंबईची जमीन त्यांच्या ताब्यात जावी. १ लाख कोटींचा अंदाज आहे. एका अतीश्रीमंताला १ लाख कोटी देण्याचा हा प्रकार आहे. आम्हाला वाटतं की महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगारांना मदतीची गरज आहे. रोजगार, महागाई या इथल्या प्रमुख समस्या आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधींनी काँग्रेस व महाविकास आघाडीची आश्वासनं सांगितली. “मी प्रत्येक भाषणात सांगतो की आमचं पूर्ण लक्ष महिलांना मदत करण्यावर आहे. आम्ही दर महिन्याला महिलांना ३ हजार रुपये देऊ. बसप्रवास त्यांच्यासाठी मोफत असेल. शेतकऱ्यांसाठी ३ लाखांपर्यंतची कर्जमाफी, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव, कांद्याच्या दरांसाठी समिती, कापसासाठी योग्य दर याशिवाय महाराष्ट्रात जातीआधारित जनगणना आम्हाला करायची आहे”, असं ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत आणली तिजोरी!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेवरून खोचक टीका करतानाच राहुल गांधींनी चक्क पत्रकार परिषदे एक तिजोरीच आणली. या तिजोरीवर ‘एक है तो सेफ है’ हे वाक्य लिहिलं होतं. या तिजोरीतून राहुल गांधींनी दोन बॅनर काढले. त्यातल्या एका बॅनरवर पंतप्रदान नरेंद्र मोदी व गौतम अदाणी यांचे एकमेकांना नमस्कार करतानाचे फोटो होते. दुसऱ्या बॅनरवर धारावीचा नकाशा होता. यावेळी त्यांनी धारावी अदाणींना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप केला.

“एका व्यक्तीसाठी धारावी संपवली जातेय”

“मोदी व अदाणींचं लक्ष धारावीवर आहे. एकीकडे अदाणी आहेत, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर, तरुणांची स्वप्न दररोज तोडली जात आहेत. तिजोरीवर लिहिलेलं हे एक है तो सेफ है हे मराराष्ट्राचं धोरण आहे. त्यांच्या घोषणेतले एक नरेंद्र मोदी, अदाणी, अमित शाह आहेत. सेफ कोण आहेत? अदाणी सेफ आहेत. कष्ट धारावीच्या जनतेला होतील. नुकसान धारावीच्या जनतेचं होईल. एका व्यक्तीसाठी धारावी संपवली जात आहे. या निवडणुकीची घोषणा मोदींनी एकदम बरोबर दिली आहे. एक है तो सेफ है. प्रश्न हा आहे की एक कोण आहे आणि सेफ कोण आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”

“संपूर्ण राजकीय व्यवस्थाच एका व्यक्तीला मदत करण्यासाठी फिरवण्यात आली. आमची खात्री आहे की ही धारावीची लूट असून ती एका व्यक्तीला दिली जात आहे. याच व्यक्तीला देशाची विमानतळं, बंदरं, संरक्षण खात्याच्या उत्पादन क्षेत्राची सर्व व्यवस्था दिली जात आहे. अदाणी हे सगळं एकट्यानं करू शकत नाहीत. पंतप्रधानांच्या मदतीशिवाय धारावी भारताच्या नागरिकांकडून अशी काढून घेतली जाऊ शकत नाही. महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार की एका व्यक्तीला हा मुद्दा आहे”, असंही राहुल गांधी म्हणाले.