Rahul Gandhi on Seat Sharing Formula for Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख पक्षांमध्ये ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला आहे. परंतु, या फॉर्म्युल्यावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्याचबरोबर, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांबरोबरच्या जागावाटपासंदर्भातील वाटाघाटीवरून राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यावर महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वडेट्टीवार यांनी राहुल गांधी नाराज नसल्याचं सांगितलं. तसेच ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी प्रत्येक उमेदवाराबाबत, प्रत्येक मतदारसंघाबाबत माहिती घेऊन आम्हाला काही सूचना केल्या”.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “आज आमची बैठक बराच वेळ चालली. थोड्याच वेळात आमची उमेदवारांची पुढील यादी जाहीर केली जाईल. तसेच उद्या उमेदवारांची अंतिम यादी जारी करू. या यादीवर केंद्रीय निवडणूक समितीबरोबर आज चर्चा झाली. उद्या परत आम्ही निवडणूक समितीशी चर्चा करू. आजच्या बैठकीत राहुल गांधी यांनी बऱ्याच उमेदवारांबाबत चर्चा केली. एकेका उमेदवाराची माहिती घेतली. योग्य उमेदवार निवडले जावे आणि पुढेही उमेदवार निवडीत गफलत होऊ नये, त्यामध्ये चुका होऊ नये, मेरिटवर उमेदवार निवडले जावे, प्रत्येक मतदारसंघातील जातीय समीकरणं उत्तम राखली जावी यावर प्रदीर्घ चर्चा झाली”. वडेट्टीवार हे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
वाटाघाटी व्यवस्थित झाल्या नाहीत? वडेट्टीवार म्हणाले…
यावेळी वडेट्टीवारांना विचारण्यात आलं की मित्रपक्षांबरोबरच्या वाटाघाटी व्यवस्थित झाल्या नाहीत म्हणून राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा चालू आहे. त्याबद्दल काय सांगाल? यावर विरोधी पक्षेनेते म्हणाले, “नाही, आजच्या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली. याचबरोबर महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला उद्या जाहीर केला जाईल”.
हे ही वाचा >> Amit Thackeray : “उद्धव ठाकरेंसारख्या लोकांपासून मी चार हात लांब, कारण..”, अमित ठाकरेंचं वक्तव्य
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्ही दिल्लीत काँग्रेस उमेदवारांच्या दुसऱ्या यादीबाबत चर्चा केली. आमची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाराष्ट्रात आमची कामगिरी चांगली झालेली दिसेल. महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण बहुमतात आलेलं तुम्हाला दिसेल. लोकसभे निवडणुकीत जशी कामगिरी झाली त्याहून चांगली कामगिरी आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारला आम्ही घालवणार आहोत.
राहुल गांधींच्या नाराजीबाबत प्रश्न विचारल्यावर पटोले म्हणाले, “आमच्या पक्षाला कायमच टार्गेट केलं जातं. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काँग्रेसला मेरिटच्या आधारावर जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. मात्र तीन पक्षांची आघाडी आहे, तसंच मित्र पक्ष आहेत. त्यामुळे समसमान जागा वाटपाचा उपाय आम्ही काढला आहे. आम्ही ही बाब राहुल गांधींना समजावून सांगितली आहे. त्यांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे. सोशल इंजिनिअरिंग हा राहुल गांधींचा अजेंडा आहे. सत्तेचा वाटा सगळ्यांना मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे.